धरणगाव आयटीआय येथे नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ.. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्याधारित शिक्षण ...
धरणगाव आयटीआय येथे नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ..
आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्याधारित शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे --- तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आयटीआय) धरणगाव येथे उद्योग-संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने झाला. या ऐतिहासिक उपक्रमाद्वारे ग्रामीण तसेच शहरी भागातील युवक-युवतींना तंत्रज्ञानाधारित व रोजगारक्षम शिक्षण खुले झाले आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, उद्योजक दिनेश लोहार, जि.व्य.शि.प्र.अ.नवनीत चव्हाण, प्र. प्राचार्य एम ए मराठे यांनी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. या कार्यक्रमाचे आयोजन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून "अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम" अंतर्गत करण्यात आले होते. धरणगाव येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धरणगावचे तहसीलदार मा. महेंद्र सूर्यवंशी यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून दिनेश भिका लोहार, जिल्हा व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मा. नवनीत व्ही. चव्हाण तसेच प्र. प्राचार्य एम. ए. मराठे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविक करताना प्राचार्य एम. ए. मराठे यांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती सविस्तर दिली. यामध्ये किसान ड्रोन ऑपरेटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टंट, सोलर पंप टेक्निशियन, फिटर फॅब्रिकेशन, असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट (महिलांसाठी), एलईडी लाईट रिपेअर, ॲडव्हान्स कम्युनिकेटिव्ह इंग्लिश आणि प्रोफेशनल स्किल ट्रेनर अशा आधुनिक व उद्योग-संरेखित अभ्यासक्रमांचा समावेश आहे. प्रमुख अतिथी दिनेश लोहार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत राबविण्यात येणारे हे आधुनिक व अल्प मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देतील. त्यामुळे रोजगार आणि स्वयंरोजगार या दोन्ही क्षेत्रात विद्यार्थ्यांना उत्तम संधी उपलब्ध होईल. युवकांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा,” असे त्यांनी आवाहन केले. यानंतर अध्यक्षस्थानी मनोगतात तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले की, “आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्याधारित शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना उद्योगाच्या गरजांशी सुसंगत असे प्रशिक्षण मिळाल्यास ते रोजगारक्षम आणि स्वयंरोजगारक्षम होऊ शकतात. या अभ्यासक्रमाचा हाच मुख्य उद्देश आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एस. एम. खरे, एस. आय. शेख, भूषण रानवे, सौ. कापडी मॅडम, भरते मॅडम, राठोड मॅडम, शिंदे मॅडम, लोकेश चावरे, समाधान कजबे, सोपान भोगे, प्रदीप नांद्रे, आर. ए. मोरे, शांताराम जाधव तसेच इतर शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डी. बी. वाघ यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन डी. एन. परदेशी यांनी मानले.

No comments