जे.टी. इंजिनियरिंग कॉलेज फैजपूर येथे दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास आणि आत्ममूल्यांकन कार्यशाळा इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायक...
जे.टी. इंजिनियरिंग कॉलेज फैजपूर येथे दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास आणि आत्ममूल्यांकन कार्यशाळा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील जे.टी. इंजिनियरिंग कॉलेजमध्ये एज्युकेशनल रिसर्च अँड रुरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तसेच जीवन संजीवनी मानव संशोधन व विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यक्तिमत्व विकास आणि आत्ममूल्यांकन’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन कॉलेजचे प्रा. व्ही. व्ही. महाजन यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रमुख वक्ते विभागीय प्रकल्प अधिकारी एजाज एम. शेख यांची ओळख करून देत त्यांचा सत्कार केला. प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एजाज शेख म्हणाले, आजचे युग अत्यंत स्पर्धात्मक आहे. व्यक्तिमत्व म्हणजे फक्त चांगले कपडे किंवा बोलणे नव्हे, तर आपल्या सुप्त गुणांना वाव देणे होय. अभिव्यक्ती उत्तम असल्यास अध्यापन, संवाद आणि समाजसेवा अधिक प्रभावीपणे करता येते. शरीरभाषा आणि आवाजावर व्यक्तिमत्व अवलंबून असते. प्रत्येकाने आपली क्षमता ओळखून ती समाजासाठी उपयोगात आणावी. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांचे आत्ममूल्यांकन चाचणीच्या माध्यमातून करण्यात आले. या चाचणीत आत्मप्रतिमा, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, सर्जनशीलता, एकाग्रता, भावनिक सुरक्षितता, मानसिक आरोग्य, शारीरिक स्वास्थ्य अशा विविध गुणांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व मापनपत्रक देण्यात आले. या प्रसंगी प्र. प्राचार्य डॉ. के. जी. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. ई. चौधरी, प्रा. व्ही. व्ही. महाजन, प्रा. एम. डी. पाटील तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत, अशा प्रकारच्या उपयुक्त कार्यशाळा नियमितपणे आयोजित कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

No comments