श्रीरामपूर नगर पालिका निवडणुकीत समाजवादी पार्टी मैदानात उतरणार ! नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागांत उमेदवार देणार – जोएफ जमादार यांची घोषणा ...
श्रीरामपूर नगर पालिका निवडणुकीत समाजवादी पार्टी मैदानात उतरणार !
नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागांत उमेदवार देणार – जोएफ जमादार यांची घोषणा
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
समाजवादी पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेश यादव व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार आबु असिम आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी श्रीरामपूर नगर पालिका निवडणुकीत समाजवादी पार्टी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. नगराध्यक्ष पदासह सर्वच प्रभागात पक्षाचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले जाणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी दिली आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सत्ताधारी पक्षांच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत “श्रीरामपूर शहराच्या विकासाला नवीन दिशा देणे हेच आमचे ध्येय आहे,” असे स्पष्ट केले. गेल्या चार वर्षांपासून नगर पालिकेवर प्रशासक राज सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या अनेक मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून विकासकामे ठप्प झाल्याचे जमादार यांनी सांगितले. नागरिकांना आजही शहराच्या काही भागात नळांमधून गटारीचे दुर्गंधीयुक्त मलमिश्रित घाण पाणी पिण्याची वेळ येते ही मोठी शोकांतिका आहे, त्यावर रस्त्यांची अवस्था देखील खुपच दयनीय आहे, नालेसफाई नियमित होत नसल्याने स्वच्छतेबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा नागरिकांनी नगर पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या तरी कोणतीही दखल घेतली जात नाही. जमादार पुढे म्हणाले की, “आजी-माजी लोकप्रतिनिधींनी या ज्वलंत प्रश्नांवर कधीच आवाज उठवला नाही. ते निवडणुकीच्या काळातच जागे होतात आणि मतदारांचे उंबरे झिजवून पुन्हा पाच वर्षे मौन धारण करतात. परंतु समाजवादी पार्टी मात्र नेहमीच लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढा देत आली आहे आणि पुढेही देत राहील.”
समाजवादी पार्टी गेल्या काही वर्षांपासून श्रीरामपूर शहरात संघटनात्मक पातळीवर सक्रिय असून युवक, महिला आणि कामगार वर्गाशी थेट संपर्कात आहे. स्थानिक पातळीवरील नागरी प्रश्न — पाणीटंचाई, स्वच्छता, रस्ते, घरकुल, आरोग्य आणि शिक्षण — यावर पक्ष सातत्याने भूमिका मांडत आला आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीत पक्षाने स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. जमादार यांनी स्पष्ट केले की, समाजवादी पार्टी ही कोणत्याही सत्ताधारी किंवा विरोधी गटाच्या आहारी न जाता स्वतःची स्पष्ट विचारसरणी आणि विकासाचा ठाम दृष्टिकोन घेऊन पुढे जात आहे. “आमचा उद्देश केवळ सत्ता मिळवणे नाही, तर शहरातील सामान्य नागरिकांना न्याय देणे, त्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणे हा आहे,” असेही त्यांनी म्हटले.
आगामी काळात पक्षाच्या उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू होणार असून प्रत्येक प्रभागात लोकाभिमुख, स्वच्छ प्रतिमेचे आणि कार्यक्षम उमेदवार उभे करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच युवकांना राजकारणात सहभागी करून शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रेरित करण्यात येईल, असेही जमादार यांनी सांगितले. शहरातील अनेक समाजघटक, व्यावसायिक आणि तरुण वर्ग या निर्णयाचे स्वागत करत आहेत. अनेकांच्या मते, समाजवादी पार्टीचा प्रवेश स्थानिक राजकारणात नवीन स्पर्धात्मकता निर्माण करेल आणि मतदारांना पर्याय उपलब्ध करून देईल. “सत्तेत आल्यास आम्ही श्रीरामपूरला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि प्रगतिशील शहर बनवू. शहरातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधा या सर्व प्रश्नांवर ठोस कृती आराखडा तयार करण्यात येईल,” असे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी सांगितले. नगर पालिका निवडणुकीसाठी पक्षाची पहिली तयारी बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर प्रचार धोरण, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व मतदार संपर्क मोहिमेला सुरुवात केली जाणार असल्याचेही यावेळी श्री.जमादार यांनी सांगितले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments