कायदेविषयक शिबिरातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज विधी सेवा समिती यावल यांच्या वती...
कायदेविषयक शिबिरातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज विधी सेवा समिती यावल यांच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) यावल येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून प्रमुख वक्ते शशिकांत वारूळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 'व्यसनाधीनतेचे जीवनातील दुष्परिणाम' या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले.
आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. आर. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार यावल येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांना विविध व्यसनांपासून दूर राहण्यासाठी 'व्यसनांचे मानवी जीवनात होणारे दुष्परिणाम' यावर कायदेविषयक प्रबोधन पर शिबिर घेण्यात आले. जगात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे दरवर्षी साठ लाख लोक मृत्यू पावतात. विशेष म्हणजे यामध्ये प्रत्यक्ष व्यसन करणारे 54 लाख मृत्युमुखी पडतात तर यांच्या संपर्कात येणारे सहा लाख लोकही नाहक मृत्युमुखी पडतात. हे प्रमाण 2030 पर्यंत 80 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. भारतात दरवर्षी अशा मृत्यूचे प्रमाण 13 लाख इतके आहे. भारत तंबाखू निर्मितीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असला तरी तंबाखूचे सेवन करण्यामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शशिकांत वारूळकर म्हणाले की, 'जर आपल्या जीवनात व्यसनांची सुरुवात झाली असेल तर त्यासाठी निकोटीन रिप्लेसमेंट साधनांचा वापर करा. 'ट्रिगर्स टाळा' म्हणजेच जेव्हा इच्छा जागृत होते तेव्हा ती जागा आणि वेळ बदलून टाका. व्यसन करणाऱ्या मित्रांची संगत सोडा तसेच आपल्या जीवनशैलीला सुधारा. सकारात्मक दिनचर्या तयार करा. चांगल्या पुस्तकांची आणि चांगल्या जीवनशैलीची कास धरा जेणेकरून आपण या व्यसनाधीनतेला आपल्या जीवनातून हद्दपार करू शकू'. भारतात व्यसनाधीन झालेले 88% लोक हे आपल्या किशोर वयात व्यसनांची सुरुवात करतात. या अनुषंगाने किशोर आणि युवकांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांचे प्रबोधन करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.डी.डी. भाबड यांनी केले तर उपस्थितांचे आभार पंकज न्हाळदे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी समांतर विधी सहाय्यक अजय बढे, हेमंत फेगडे, आयसीटीसी चे समुपदेशक श्री.वसंत संदांशिव तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य टी. आर.पाटील, एस बी पाटील आणि इतर प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.

No comments