पैशाच्या वादातून मित्राचा खून.. स्विफ्टने कारला धडक देत केले ठार,दोनच दिवसात आरोपीस एलसीबी च्या पथकाने ठोकल्या बेड्या सचिन मोकळं अहिल्यान...
पैशाच्या वादातून मित्राचा खून.. स्विफ्टने कारला धडक देत केले ठार,दोनच दिवसात आरोपीस एलसीबी च्या पथकाने ठोकल्या बेड्या
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१):-पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मित्राचा पाठलाग करून कारला धडक देत त्याचा खून केल्याच्या धक्कादायक घटनेतील आरोपी तेजस संजय काळे (रा.कानगुडेवाडी,ता. कर्जत) यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या पथकाने अवघ्या दोन दिवसांत जेरबंद केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दि.28 ऑक्टोबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास मयत चंद्रशेखर रामदास जाधव व त्याचा मित्र पृथ्वीराज साळुंके हे कोर्टी–राशीन शिवारातून स्विफ्ट (MH16 DC 8185) कारने जात असताना आरोपी तेजस काळे याने आपल्या स्विफ्ट (MH12 NJ 5720) कारने त्यांचा पाठलाग केला.पैशाच्या वादातून चंद्रशेखर याला ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपीने त्यांच्या कारला पाठीमागून जबर धडक दिली.या धडकेत चंद्रशेखर जाधव जागीच ठार झाला तर साळुंके गंभीर जखमी झाला.या प्रकरणी सुभाष शंकर जाधव यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गु.र.नं. 588/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), 118(1), 125(A)(B), 281, 324(4) व मोटार वाहन कायदा कलम 134(A)(B), 177, 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला अटक करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे,फुरकान शेख, भाऊसाहेब काळे,अमोल पोपट, बाळासाहेब खेडकर,मनोज साखरे आणि चालक अरुण मोरे यांनी सापळा रचून बनपिंप्री शिवारात आरोपी तेजस काळे यास ताब्यात घेतले.आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार (किंमत ₹5,30,000) आणि तीन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस पुढील तपासासाठी कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे केली.

No comments