'वंदे मातरम राष्ट्रगीता' च्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आली आढावा बैठक भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
'वंदे मातरम राष्ट्रगीता' च्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आली आढावा बैठक
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यातील सर्व तालुक्यात तालुकास्तरीय समित्यांची नेमणूक करण्यात आले आहेत. 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची नियोजनाची आढावा बैठक यावल च्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात पार पडली.
देशभक्तीचे प्रतीक, स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणा स्रोत आणि प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत तेवत ठेवणारे 'वंदे मातरम' हे गीत. मा. बकिमचंद्र चटोपाध्याय यांनी 'आनंदमठ' या आपल्या कादंबरीमध्ये रचले आहे. जे गीत स्वतंत्र लढ्यातील क्रांतिकारकांसाठी प्रेरणास्रोत बनले होते. त्यांच्या या गीताचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या गीतामध्ये भारत भूमीचे स्तुती गायन केलेले आपल्याला दिसते. या राष्ट्रगीताला 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, यावल यांच्या माध्यमातून यावल बस स्थानक शेजारील मैदानावर दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 11 वाजे दरम्यान शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक आणि सर्वच परिसरातील नागरिकांसाठी देशभक्ती आणि देश प्रेमाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील 5 हजार विद्यार्थी, नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास यावल तालुका आयोजन समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी यावल तहसील कार्यालयात मा. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मार्गदर्शनाखाली पार पडली. मंगळवारी झालेल्या या बैठकीला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच समितीचे सर्व नामनिर्देशित सदस्य उपस्थित होते.

No comments