यावल नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
यावल नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर यावल नगरपालिका क्षेत्रात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक सहा मध्ये यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या प्रभागातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमर कच्ची यांचे नाव पुढे येत असून त्यांनी आतापासूनच जनसंपर्काची जोरदार तयारी सुरू केली आहे. समाजसेवा हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ते नागरिकांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या गरजू लोकांना दवाखाना, औषधोपचार, तसेच लग्नकार्यासाठीही मदत केल्याचे उदाहरणे नागरिकांकडून दिली जातात.
काही महिन्यांपूर्वी प्रभागात नगरपालिकेचे पाइपलाइनचे काम सुरू झाल्यानंतर रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले होते. नागरिकांना या रस्त्यांवरून चालणे कठीण झाले होते. या वेळी उमर कच्ची यांनी स्वखर्चातून खड्डे व गटारी दुरुस्तीची कामे करून घेतली, ज्याचे नागरिकांनी कौतुक केले. हिंदू-मुस्लिम समाजातील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत ते सक्रियपणे सहभागी होत असतात. शहरात शांतता व सौहार्द राखण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा यावल पोलीस स्टेशनतर्फे गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या या कामांची चर्चा संपूर्ण यावल शहरात असून, काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. नागरिकांचा त्यांना चांगला प्रतिसाद असल्याने प्रभाग क्रमांक सहामध्ये त्यांचा विजय पक्का मानला जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


No comments