adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शासन आदेशांचे उल्लंघन करून घरकुलासाठी जागावाटप रोखल्याचा आरोप ग्रामपंचायती विरोधात अंतिम स्मरणपत्र; 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा

 शासन आदेशांचे उल्लंघन करून घरकुलासाठी जागावाटप रोखल्याचा आरोप  ग्रामपंचायती विरोधात अंतिम स्मरणपत्र; 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा  ...

 शासन आदेशांचे उल्लंघन करून घरकुलासाठी जागावाटप रोखल्याचा आरोप

 ग्रामपंचायती विरोधात अंतिम स्मरणपत्र; 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा  


चोपडा | प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील कठोरा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथे शासन मालकीच्या रिक्त जागेचे घरकुलासाठी वाटप न करता शासन आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत प्रशासनावर करण्यात आला आहे. या संदर्भात भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने पंचायत समिती चोपडा, तहसीलदार चोपडा व चोपडा पोलीस स्टेशन यांना अंतिम स्मरणपत्र देण्यात आले आहे. संबंधित निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिनांक 29 ऑक्टोबर 2025 व 09 डिसेंबर 2025 रोजी शासन मालकीच्या रिक्त जागेचे घरकुल बांधकामासाठी पात्र आदिवासी, निराधार, बेघर व भूमिहीन कुटुंबांना वाटप करण्याबाबत लेखी निवेदने सादर करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न करता ग्रामपंचायतीने शासनाच्या घरकुल योजनांच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दुर्लक्षामुळे अनेक गरजू कुटुंबे आजही बेघर अवस्थेत जीवन जगत असून ही बाब सामाजिक अन्यायाला कारणीभूत ठरत असल्याचे निवेदनात नमूद आहे. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

स्मरणपत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, ७ दिवसांच्या आत शासन मालकीच्या जागेचे सर्वेक्षण, पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी व जागावाटपाची अधिकृत प्रक्रिया तात्काळ सुरू न केल्यास, 26 जानेवारी 2026 रोजी पंचायत समिती कार्यालय, चोपडा येथे आमरण उपोषण, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रार व चौकशी, तसेच भीम आर्मी भारत एकता मिशनजिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या माध्यमातून जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या सर्व कायदेशीर व प्रशासकीय परिणामांस ग्रामसेवक सौ. मनीषा महाजन, सरपंच एकनाथ कोळी व ग्रामपंचायत कठोरा येथील सर्व सदस्य जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे. सदर निवेदनावर मुबारक तडवी (चोपडा तालुका अध्यक्ष) व राहुल जयकर (भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व पत्रकार) यांच्या सह्या असून या प्रकरणाची प्रत विभागीय आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव व जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. निवेदन सादर करताना उपस्थित मुबारक तडवी, रविंद्र भील, अनिल भील,अविनाश साळुंखे सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते.

No comments