लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना महिलांनी अधिकृत सीएससी किंवा सेतू केंद्रातच करा – संदीप आसने श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकां...
लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना महिलांनी अधिकृत सीएससी किंवा सेतू केंद्रातच करा – संदीप आसने
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळावा यासाठी केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र श्रीरामपूर तालुक्यात अनेक ठिकाणी ही केवायसी करताना मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून येत असून, चुकीच्या पद्धतीने केवायसी झाल्यामुळे अनेक पात्र महिलांचे अर्ज अडचणीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांनी केवायसी प्रक्रिया करताना फक्त अधिकृत सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) किंवा सेतू केंद्रातच केवायसी करावी असे आवाहन भाजप सोशल मीडिया सेलचे तालुका संयोजक संदीप आसने यांनी केले आहे.
संदीप आसने यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना महिलांनी वडील किंवा पती यांच्या आधारकार्डच्या माध्यमातूनच केवायसी करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी वडील किंवा पती यांच्या मोबाईलवर ओटीपी येत नसल्यास, काही खाजगी एजंटांकडून महिलांना चुकीचा सल्ला देत कुटुंबातील इतर सदस्यांचा आधार वापरण्यात येत आहे. अशा प्रकारे केलेली केवायसी नियमबाह्य ठरू शकते आणि भविष्यात महिलांचा योजनेचा लाभ थांबण्याची शक्यता निर्माण होते.
श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये खाजगी एजंटांकडून महिलांची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही ठिकाणी अपूर्ण माहिती, चुकीची कागदपत्रे, तसेच चुकीचे आधार लिंकिंग यामुळे महिलांचे अर्ज बाद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, शासनमान्य केंद्रातूनच केवायसी करून घ्यावी असेही आसने यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, सीएससी आणि सेतू केंद्रांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच केवायसी प्रक्रिया केली जाते. त्यामुळे अशा केंद्रांमध्ये केवायसी केल्यास त्रुटी राहण्याची शक्यता कमी असते. तसेच महिलांनी केवायसी करताना आपली वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक, मोबाईल नंबर याबाबत दक्षता घ्यावी आणि कोणालाही अनावश्यक माहिती देऊ नये.
लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची योजना असून, केवायसीतील छोट्या चुका सुद्धा लाभ मिळण्यास अडथळा ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक महिलेने जबाबदारीने आणि योग्य ठिकाणीच केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन संदीप आसने यांनी शेवटी केले. या योजनेचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी महिलांनी सतर्क राहून अधिकृत केंद्रांचीच निवड करावी, असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेवटी नमूद केले आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments