महायुतीची चर्चा ठप्प..अहिल्यानगर महानगरपालिकेत तिहेरी लढतीचे संकेत तीनही पक्ष स्वतंत्र रणांगणात..? उमेदवारांमध्ये एकच संभ्रम सचिन मोकळं अहि...
महायुतीची चर्चा ठप्प..अहिल्यानगर महानगरपालिकेत तिहेरी लढतीचे संकेत तीनही पक्ष स्वतंत्र रणांगणात..? उमेदवारांमध्ये एकच संभ्रम
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२९):-अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम धामधूम सुरू असतानाच महायुतीतील जागावाटपाची चर्चा थांबल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) हे तीनही घटक स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महायुती तसेच महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचे अधिकृत उमेदवार अद्याप जाहीर न झाल्याने शहरातील सर्वच प्रभागांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.जागा वाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना कोणताही ठोस निष्कर्ष न लागल्यामुळे इच्छुक उमेदवारांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत आहे.
दर तासाला सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरत असून, “आपणच अधिकृत उमेदवार राहणार की नाही?” या संभ्रमात अनेक इच्छुक उमेदवार सापडले आहेत. परिणामी,अनेकांनी खबरदारी म्हणून दोन-दोन प्रभागांतून,तर काहींनी पत्नीच्या नावानेही उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे कोणत्या पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण, हे अद्यापही अस्पष्ट आहे.अर्ज भरण्याची अंतिम मुदत उद्या संपत असल्याने आज दिवसभर निवडणूक कार्यालयात उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी होती.या पार्श्वभूमीवर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी नगर शहरात तळ ठोकत आमदार संग्राम जगताप तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांबरोबर जागावाटपाबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान,महायुतीत शिंदे गटाला अपेक्षेप्रमाणे जागा मिळत नसल्याने असंतोष वाढल्याचे स्पष्ट संकेत आहेत.शिंदे गट आपल्या जागांच्या मागणीवर ठाम असून,वेळप्रसंगी स्वतंत्र लढतीचा निर्णय घेण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतील चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाल्याचे सांगितले जात असून,शिवसेना शिंदे गटाने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याने अधिकृत माहिती येईपर्यंत अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल,असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
एकंदरित पाहता,महायुतीतील विसंवाद आणि विलंबामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची व तिहेरी लढतीची होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. आता शेवटच्या क्षणी कोणता पक्ष कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments