विकास तू पूर्ण गावभर फिरलास… मग आमच्या दोनच गल्लीत का नाही आलास? (सदरील लेखाचा कुठल्याही शहरांशी किंवा गावांशी संबंध नाही, मिळता जुळता असल...
विकास तू पूर्ण गावभर फिरलास… मग आमच्या दोनच गल्लीत का नाही आलास?
(सदरील लेखाचा कुठल्याही शहरांशी किंवा गावांशी संबंध नाही, मिळता जुळता असल्यास निव्वळ योगायोग समजावा)
विकास…
एक असा शब्द जो दर निवडणुकीत, दर सभेत, दर भाषणात मोठ्या अभिमानाने उच्चारला जातो. “गावाचा विकास झाला”, “सर्वांगीण विकास केला”, “सुविधा घराघरात पोहोचवल्या” अशी वाक्ये कानावर पडतात.
तू म्हणतोस की संपूर्ण गावाचा विकास झाला. रस्ते झाले, दिवे लागले, योजना आल्या. हो, हे सगळं झालंय… पण मग आमच्या दोनच गल्ल्यांच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा का आली? पण विकासा, एक साधा प्रश्न आहे—
तू पूर्ण गावभर फिरलास, मग आमच्या दोनच गल्लीत का नाही आलास?
आम्ही अजूनही वाट पाहतोय. आतुरतेने… आशेने… आणि आता थोड्या नाराजीनेही.
सन २००४/२००५ आठवतंय का तुला? त्यावेळी तू आमच्याबरोबर होतास. आम्हाला स्वप्ने दाखवली रस्त्यांची, पाण्याची, दिव्यांची, स्वच्छतेची, शिक्षणाची, आरोग्याची. तेव्हा आम्ही विश्वास ठेवला. कारण विकासावर विश्वास ठेवणं हीच तर गावकऱ्यांची सवय असते.
या वीस वर्षांत— आमच्या गल्लीत जन्मलेली मुलं मोठी झाली, शाळेतून कॉलेजमध्ये गेली, नोकरीच्या शोधात गाव सोडून गेली. काही आई-वडील म्हातारे झाले, तर काहीजण विकासाची वाट पाहतच, या जगातून निघून गेले.
पण विकासा,
आमच्या गल्ल्यांचं नशीब मात्र बदललं नाही. आजही आमच्या गल्लीत— रस्ता तसाच खड्ड्यांनी भरलेला आहे, पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धूळ, रात्री अंधार, पाण्याची अनियमितता, आणि समस्या विचारायला कोणीच नाही.
मग प्रश्न पडतो—
आमच्या गल्लीत राहणारी माणसं गावाची नाहीत का? आमच्या घरांची मते मोजली जात नाहीत का? की विकास फक्त मुख्य रस्त्यांवरच थांबतो?
विकासा,
तुला आमच्या गल्लीतल्या माणसांची आठवण का होत नाही? तेही शेतात राबतात, तेही कर भरतात, तेही निवडणुकीत उभे राहतात, तेही “गाव माझं आहे” असं अभिमानाने सांगतात. आम्हाला मोठ्या गोष्टी नकोयत. फक्त— चालण्यासारखा रस्ता, स्वच्छ पाणी, थोडासा उजेड, आणि समस्यांकडे पाहणारा एक संवेदनशील दृष्टीकोन. आज हा लेख म्हणजे केवळ तक्रार नाही, तर एक आर्त हाक आहे. कारण विकास जर सगळ्यांसाठी नसेल, तर तो विकास कसा म्हणायचा?
विकासा,
आजही आम्ही वाट पाहतोय, उशीर झालाय, पण दार बंद केलेलं नाही. फक्त एकच अपेक्षा— या वेळी तरी आमच्या गल्लीत येशील.
![]() |
| शामसुंदर सोनवणे पत्रकार हातेड/चोपडा मो.8208449983 |

No comments