जळगाव येथे आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ३ हजार खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत सहभागी भरत कोळी यावल ता. प्...
जळगाव येथे आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी
३ हजार खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत सहभागी
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धा सन २०२५–२६ दिनांक १६ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे होणार आहेत. या स्पर्धांसाठी जळगाव शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून सुमारे ३ हजार खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होणार आहेत. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मंगळवार, १६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मा. ना. प्रा. डॉ. अशोक वुईके, मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनप्रसंगी मा. ना. श्रीमती रक्षा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री (युवा कल्याण व क्रीडा), मा. ना. श्री गिरीश महाजन, मंत्री (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन), मा. ना. श्री गुलाबराव पाटील, मंत्री (पाणीपुरवठा व स्वच्छता) व पालकमंत्री, जळगाव तसेच मा. ना. श्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धांचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ बुधवार, १८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीमती लीना बनसोडे, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धांमध्ये नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांतील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होणार आहेत. या विभागीय स्पर्धांमधून निवड झालेले विद्यार्थी पुढे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जाणीव, संघभावना, शिस्त व कार्यक्षमता वाढवणे, तसेच क्रीडागुणांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.


No comments