युवतींच्या टोळीचा क्रूर चेहरा उघड..!बोल्हेगाव महिलेच्या खुनाचा एलसीबीने केला असा उलगडा.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
युवतींच्या टोळीचा क्रूर चेहरा उघड..!बोल्हेगाव महिलेच्या खुनाचा एलसीबीने केला असा उलगडा..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- बोल्हेगाव, एम.आय.डी.सी. परिसरात घडलेल्या एका धक्कादायक खूनप्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला असून चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या चार युवतींच्या टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.दि.१२ डिसेंबर २०२५ रोजी मनिषा बाळासाहेब शिंदे (वय ४०, रा. कौस्तुभ कॉलनी, भारत बेकरी रोड, बोल्हेगाव) या आपल्या राहत्या घरी एकट्याच असताना अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला होता. याप्रकरणी मयत महिलेचे पती बाळासाहेब साहेबराव शिंदे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर ११८३/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३३२(अ) अन्वये दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळाची पाहणी, परिसरातील माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास वेगाने पुढे गेला.तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार हा खून दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (वय २०, रा. बालाजी नगर, बोल्हेगाव) हिने तिच्या इतर साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी दिव्या देशमुख हिच्यासह अंजुम ऊर्फ मेहक अहमद सैफी (वय २२) तसेच दोन विधीसंघर्षित बालिका (वय १६ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले.चौकशीत आरोपी दिव्या देशमुख हिने दिलेल्या कबुलीनुसार, मयत महिला तिच्या घराच्या शेजारी राहत असल्याने तिच्याकडे असलेल्या दागिन्यांची माहिती आरोपींना होती. दागिने चोरण्याच्या उद्देशाने सर्व आरोपी मयत महिलेच्या घरात गेले. दागिने जबरदस्तीने काढताना मयत महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपींनी तिच्या गळ्यावर व हनुवटीवर धारदार शस्त्राने वार करून खून केला.सर्व आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

No comments