धुळे जिल्ह्यात दुसरी पत्नी ठरली शेवटची सोबत, दोघांनी संपविले जीवन धुळे जिल्हा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धुळे जिल्ह्यातील शिरपू...
धुळे जिल्ह्यात दुसरी पत्नी ठरली शेवटची सोबत, दोघांनी संपविले जीवन
धुळे जिल्हा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यांतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरपूर येथील सटीपाणी शिवारात दुसऱ्या पत्नीसोबत पळून गेलेल्या तरुणाने तिच्यासह गळफास घेवुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (दि. 28) रोजी सकाळी उघडकीस आली. या दुहेरी आत्महत्येमुळे परिसरांत एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सटीपाणी शिवारात राहणारा पप्पू मांगीलाल पावरा (वय 23) याचा यापूर्वीच विवाह झाला होता. मात्र त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने लक्ष्मी पावरा (वय 19) हिच्याशी दुसरा विवाह केला होता. पप्पूचा पहिला विवाह झाल्याची माहिती लक्ष्मीला होती, असेही सांगण्यात येत आहे.
सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असताना सुमारे आठ दिवसांपूर्वी पप्पू व लक्ष्मी हे दोघे अचानक घरातून पळून गेले होते. नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच (दि.28) रोजी सकाळी सटीपाणी शिवारातील एका शेतात दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने शिरपूर पोलिसांना कळविले. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह खाली उतरवून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.या दुहेरी आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शिरपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

No comments