शेतकऱ्यांच्या लुटीवर स्वाभिमानीचा थेट हल्लाबोल “बाजार समिती शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी?” – जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडेंच...
शेतकऱ्यांच्या लुटीवर स्वाभिमानीचा थेट हल्लाबोल
“बाजार समिती शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी?” – जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडेंचा संतप्त सवाल
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
“शेतकऱ्याची तूर बाजारात उतरते, पण दर उतरतो; व्यापाऱ्याचा नफा वाढतो आणि बाजार समिती प्रशासन गप्प बसते—हे नेमके कुणाच्या हिताचे राज्य आहे?” असा थेट, घणघणीत सवाल उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुरीच्या खरेदीत शेतकऱ्यांची उघड लूट सुरू असताना प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
शासन जाहीर करते हमीभाव, मात्र मलकापूर बाजार समितीत तो केवळ कागदावरच उरल्याचे वास्तव आहे. तूर खरेदी हमीभावाने न करता व्यापाऱ्यांच्या मनमानी दराने केली जात आहे. या लुटीला आळा घालण्याची जबाबदारी असलेले बाजार समिती प्रशासन मात्र मूकदर्शकाची भूमिका बजावत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
शेतकऱ्याच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी स्थापन झालेल्या बाजार समितीतच जर शेतकऱ्याची लूट होत असेल, तर ही व्यवस्था नेमकी कोणासाठी काम करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे व्यापाऱ्यांचे फावले असून शेतकरी मात्र आर्थिक कोंडीत सापडला आहे.
अधिक संतापजनक बाब म्हणजे बाजार समितीतील अमानवी अवस्था. शेतकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी नाही, बसण्यासाठी साधी व्यवस्था नाही, शौचालयांचा अभाव आहे. दिवसभर उन्हात रांगेत उभा राहणाऱ्या शेतकऱ्याला माणूस म्हणून वागणूक देण्याचीही तसदी प्रशासन घेत नसल्याची तीव्र टीका करण्यात आली आहे. ही केवळ निष्काळजीपणा नसून शेतकऱ्यांप्रती असलेली असंवेदनशील मानसिकता असल्याचे नारखेडे यांनी स्पष्ट केले.
यावर कळस म्हणजे बाजार समितीतील तोल काटा बंद अवस्थेत असणे. वजनात पारदर्शकता नसताना व्यवहार सुरू ठेवणे म्हणजे शेतकऱ्याच्या खिशावर थेट डल्ला मारण्यासारखे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असताना प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या सर्व मुद्द्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. मात्र, तात्काळ हमीभावाने तूर खरेदी सुरू न झाल्यास आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून न दिल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशारा युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी दिला आहे. गरज पडल्यास बाजार समितीवर धडक मोर्चा, रास्ता रोको आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळू ठाकरे, गोपाल रायपूरे, तालुकाध्यक्ष गोपाल सातव, विश्वास होले, प्रमोद पाटील, सुरेश चौधरी, विनोद सरोदे, सीताराम ढोन, भगवान संबारे, संदीप खाचणे, कुंदन पाटील, सचिन देशमुख, अनिल घाटे, राहुल इंगळे, प्रतिक होले, सारंग खर्चे, दिपक पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. हा प्रश्न केवळ तुरीच्या दराचा नाही, तर शेतकऱ्याच्या स्वाभिमानाचा आहे. बाजार समितीने तात्काळ जागे होऊन व्यापाऱ्यांच्या मनमानीला आवर घालावा, हमीभावाने खरेदी सुरू करावी आणि शेतकऱ्यांसाठी किमान सुविधा उपलब्ध करून द्याव्यात—अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही, हे प्रशासनाने लक्षात घ्यावे.


No comments