भालोदच्या मंदार चौधरी यांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यशवंतराव चव्हाण केंद्राच्या ...
भालोदच्या मंदार चौधरी यांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीने दिली जाणारी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (कादंबरी – साहित्य प्रकार) भालोद (जि. जळगाव) येथील मंदार अनिल चौधरी यांना प्रदान करण्यात आली. हा पुरस्कार नरिमन पॉईंट, मुंबई येथे झालेल्या समारंभात मा.शरदचंद्रजी पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रिया सुळे, साहित्य फेलोशिपचे प्रमुख नितीन रिंढे, समन्वयक दत्ता बाळसराफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात शरद पवार यांची पूर्णवेळ उपस्थिती होती. फेलोशिप म्हणजे पारंपरिक शिष्यवृत्ती संकल्पनेचे सुधारित स्वरूप असून, याअंतर्गत निवडलेल्या साहित्यिकांना वर्षभर तज्ज्ञ लेखकांचे मार्गदर्शन, कार्यशाळा तसेच १ लाख रुपये मानधन दिले जाते. कादंबरी लेखन हा साहित्यप्रकार अत्यंत आव्हानात्मक असून, मोठा कथापट उभा करून वाचकांना खिळवून ठेवणे हे मोठे कौशल्य आहे.
परदेश वगळता भारतात कादंबरी लेखनासाठी दिली जाणारी ही एकमेव फेलोशिप असून, तिची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि काटेकोर आहे. यावर्षी या साहित्य प्रकारासाठी १२९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १२ साहित्यिकांची अंतिम निवड करण्यात आली आहे. निवड झालेले फेलो यशवंतराव चव्हाण केंद्राच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर त्यांच्या साहित्यकृतींवर काम करणार असून, या कलाकृती लवकरच प्रकाशित केल्या जाणार आहेत. जळगाव जिल्ह्यातून मंदार अनिल चौधरी हे या यादीतील एकमेव फेलो ठरले आहेत.

No comments