सामाजिक बदलासाठी आपली छोटीशी पावले समाज म्हणजे फक्त माणसांची गर्दी नाही, तर संस्कार, परंपरा, विचार व मूल्यांची जडणघडण करणारी एक मोठी शाळाच...
सामाजिक बदलासाठी आपली छोटीशी पावले
समाज म्हणजे फक्त माणसांची गर्दी नाही, तर संस्कार, परंपरा, विचार व मूल्यांची जडणघडण करणारी एक मोठी शाळाच असते. या शाळेत प्रत्येक दिवस नवे धडे शिकायला मिळतात — प्रेमाचे, समजूतदारपणाचे, एकतेचे आणि कधी बदलाची गरज ओळखण्याचे. आज आपण तंत्रज्ञानाने चंद्रावर पोहोचलो, पण काही मनं अजूनही अंधश्रद्धा, जातीयता, भेदभाव, स्त्रियांचं स्थान, पर्यावरणाची हानी या समस्यांमध्ये अडकलेली दिसतात. शिक्षण वाढलंय पण संवेदनशीलता कमी होत चाललीय, हे वास्तव आपण विसरू नये. समाज म्हणजे फक्त लोकांचा समूह नव्हे, तर एकमेकांसाठी उभं राहणाऱ्या मनांचा परिवार. आजच्या वेगवान युगात विज्ञान-तंत्रज्ञान प्रगती झपाट्याने होत आहे, परंतु त्याचवेळी सामाजिक मूल्यांची हळूहळू घसरण देखील आपल्याला जाणवते. विकासाची गाडी पुढे जात असताना ‘माणुसकी’ मात्र मागे पडतेय असं अनेकदा वाटतं. आपला देश "वसुधैव कुटुंबकम्"ची शिकवण देतो, परंतु व्यवहारात मात्र जाती-धर्म, श्रीमंती-दारिद्र्य, स्त्री-पुरुष भेद या सगळ्यांच्या भिंती अजूनही उभ्या आहेत. शिक्षण वाढत असलं, शहरं बदलत असली, तरी काही विचार अजूनही जुन्याच चौकटीत अडकलेले दिसतात. समाजातील समस्या फक्त सरकार किंवा नेत्यांच्या हातात नाहीत. प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी स्वीकारली, तर समस्येचे निराकरण सुकर होऊ शकते. रस्त्यावर पडलेला कचरा उचलणं, शाळेबाहेर असलेल्या मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करणं, महिलांचा सन्मान राखणं, वृक्षारोपणासह पर्यावरण जपणं — या छोट्या कल्पना मोठा बदल घडवू शकतात. आज प्रत्येकाला सोशल मीडियावर समाज बदलायचा आहे; पण प्रत्यक्ष कृतीत मात्र कमी पडत असतो. खरी ‘क्रांती’ की-बोर्डच्या बटणांनी नव्हे, आपल्या कृतींनी घडते.
“एक चांगले काम इतर शंभरांना प्रेरणा देते” हे लक्षात ठेवूया. समाजातील अच्छाईची मशाल विझू न देणं हीच खरी देशसेवा आहे. एकमेकांना मदतीचा हात देताना मनात कुठलाही भेदभाव ठेवू नये. प्रेम, समजूतदारपणा, आणि आदर — हेच समाजाला जोडणारे धागे आहेत. जर प्रत्येकाने स्वतःमध्ये थोडा बदल घडवला, तर समाज बदलायला वेळ लागणार नाही.
बदलाची सुरुवात समाजातून नव्हे, ‘आपल्यापासून’ होणे गरजेचं आहे.
शामसुंदर सोनवणे (पत्रकार)हातेड /चोपडा

No comments