adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि पोदार प्रेप, अकलूद येथे तीन दिवसीय भव्य वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

  पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि पोदार प्रेप, अकलूद येथे तीन दिवसीय भव्य वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न   भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक...

 पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि पोदार प्रेप, अकलूद येथे तीन दिवसीय भव्य वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न  


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पोदार इंटरनॅशनल स्कूल व पोदार प्रेप, अकलूद येथे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी कला, मूल्ये आणि भारतीय सांस्कृतिक वारसा यांचे सुंदर दर्शन घडवत उपस्थितांची मनं जिंकली. प्रत्येक दिवशी कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विषयानुरूप नाटिका, समूह नृत्य आणि गीतनृत्य सादर केले. पहिला दिवस इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता होता. स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचे दर्शन घडवणाऱ्या नाटिका, देशभक्तीपर गीते आणि आकर्षक नृत्यांनी वातावरण भारावून गेले. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा. श्री. एम. झेड. सरवार, मुख्य महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत देशप्रेम आणि शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्य मा. श्री. सचिन बनसोडे सर यांनी विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाचे कौतुक करत सांगितले की, “स्वातंत्र्याचा प्रवास समजून घेणे आणि त्यातील त्याग जाणून घेणे ही पुढील पिढीची जबाबदारी आहे. आज मुलांनी अप्रतिम अभिनय आणि नृत्यांच्या माध्यमातून देशभक्तीची भावना जिवंत केली.” दुसऱ्या दिवशी इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित प्रभावी नाटिका, पोवाडा, युद्धदृश्ये आणि समूह नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक आणि स्वराज्य स्थापनेचा इतिहास जिवंत केला. 


मुख्य अतिथी म्हणून मा. श्री. संदीप गवित, उपविभागीय पोलीस अधीक्षक, भुसावळ उपस्थित होते. त्यांनी शिवरायांचे आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.

आपल्या संदेशात प्राचार्यांनी सांगितले, “शिवरायांचे धैर्य, नेतृत्व आणि न्यायप्रियता आजही आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देतात. विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम केवळ कलात्मक नव्हता, तर मूल्यांचे प्रभावी शिक्षण देणारा होता. ”तिसऱ्या दिवशी नर्सरी ते सीनियर केजी या लहानग्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेशभूषेत गाणी, तालबद्ध नृत्य आणि छोट्या नाटिकांच्या माध्यमातून सभागृह आनंदी केले. भारतीय संगीत आणि वाद्य परंपरेचा सुंदर मिलाफ त्यांनी सादर केला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा. सौ. गौरी खानापूरकर होत्या. त्यांनी बालकलाकारांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.पोदार प्रेपच्या डायरेक्टर स्वाती पोपट वत्स यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका सौ. मनिषा शृंगी यांनी बालकलाकारांचे अभिनंदन करत शाळेच्या शैक्षणिक तत्त्वांचे विवेचन केले.

प्राचार्य श्री. बनसोडे यांनी सांगितले, “लहानग्या मुलांची सहजता, आत्मविश्वास आणि मंचावरील नैसर्गिकता पाहून मन भरून आले. या वयात कलांच्या माध्यमातून व्यक्त होणे ही त्यांच्या सर्वांगीण विकासाची सुरुवात आहे. ”स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. CBSE बोर्ड परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांतील विजेते यांचा विशेष गौरव करण्यात आला. समारोपप्रसंगी प्राचार्यांनी पालक, शिक्षक आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यासाठी आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “शिक्षणासोबत कला, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा समतोल साधणे हीच पोदारची ओळख आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवाने मुलांच्या प्रतिभेला सुंदर वाव दिला.” शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक, कर्मचारी आणि पालक यांच्या सहकार्यामुळे हे तीन दिवसीय स्नेहसंमेलन अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाले.

No comments