बांगरी षष्ठीनिमित्त गणेशगावात खंडेराव महाराजांची भव्य यात्रा डोंगरावर भाविकांची गर्दी; पूजा, मिरवणूक व कुस्त्यांच्या दंगलीने रंगत प्रतिनि...
बांगरी षष्ठीनिमित्त गणेशगावात खंडेराव महाराजांची भव्य यात्रा
डोंगरावर भाविकांची गर्दी; पूजा, मिरवणूक व कुस्त्यांच्या दंगलीने रंगत
प्रतिनिधी : जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडेराव महाराज यांची वार्षिक यात्रा बांगरी षष्ठीनिमित्त गणेशगाव येथे मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडली. दरवर्षी पोस्ट षष्ठीच्या दिवशी ही यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येते.सकाळपासूनच गणेशगावच्या डोंगरावर असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिर परिसर आकर्षक सजावट व रंगरंगोटीने खुलून दिसत होता. यात्रेनिमित्त सकाळी सरपंच अंबादास महाले यांच्या हस्ते श्री खंडेराव महाराजांची षोडशोपचारे पूजा-अर्चा, नैवेद्य अर्पण व आरती करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात उंच मानाच्या काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरात विविध मनोरंजनाची साधने तसेच रेवडी, गोडीशेव, जिलेबी आदी खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली होती. दुपारी तीनच्या सुमारास कुस्त्यांच्या दंगलीस सुरुवात झाली. या कुस्त्यांसाठी जिल्हा व तालुक्यातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या डोंगरावरील यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी गणेशगावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. यात्रा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

No comments