हेमलकसा म्हणजे केवळ एक गाव नाही,तो एक सजीव संस्कार आहे— मा. डॉ. प्रकाश आमटे साहेब, हेमलकसा म्हणजे केवळ एक गाव नाही,तो एक सजीव संस्कार आहे...
हेमलकसा म्हणजे केवळ एक गाव नाही,तो एक सजीव संस्कार आहे—
मा. डॉ. प्रकाश आमटे साहेब,
हेमलकसा म्हणजे केवळ एक गाव नाही,तो एक सजीव संस्कार आहे—
माणसांसाठी, प्राण्यांसाठी, निसर्गासाठी आणि माणुसकीसाठी. आपण केवळ आदिवासी बांधवांचेच नाही, तर पशु-पक्षी, वन्यप्राणी आणि संपूर्ण जंगलाचेही “भाऊ” आहात.जखमी वन्यप्राणी असो, आजारी पाळीव प्राणी असो किंवा संकटात सापडलेला एखादा पक्षी—आपल्या हातात त्यालाही माणसासारखाच मायेचा, सुरक्षिततेचा आधार मिळतो. म्हणूनच हेमलकसामध्ये केवळ माणसेच नाही, तर प्राणीही आपल्यावर विश्वास ठेवतात—आणि हाच विश्वास आपल्याला “प्रकाश भाऊ” बनवतो.दुर्गम जंगलात आपण आणि आपले कुटुंब गेली अनेक दशके जे कार्य उभे करत आहात, ते आरोग्यसेवा किंवा समाजकार्यापुरते मर्यादित नाही.ते संपूर्ण सृष्टीशी असलेल्या करुणेचे दर्शन आहे— जिथे माणूस, प्राणी आणि निसर्ग यांच्यात भेद नाही. माझ्या आयुष्यातील काही अतिशय जिव्हाळ्याच्या आठवणी या कार्याशी जोडलेल्या आहेत.माझ्याच वाढदिवसानिमित्त मी आणि आरती सपत्नीक तीन दिवस हेमलकसामध्ये मुक्कामी थांबलो होतो. त्या काळात आदिवासी बांधवांसोबतच, आजारी प्राणी, जखमी वन्यजीव यांच्यावर ज्या मायेने उपचार होताना पाहिले—ते दृश्य मनात कोरले गेले. तो वाढदिवस साजरा करण्याचा नव्हे, तर माणूस म्हणून समृद्ध होण्याचा अनुभव होता. तसेच एकदा मुंबईतील मित्रांचा एक समूह खास हेमलकसा येथे घेऊन जाण्याचा योग आला.शहरात राहणाऱ्या या मित्रांनी आपल्या समाजकार्याबरोबरच प्राणी-दयेचा हा अनोखा संस्कार प्रत्यक्ष अनुभवला. त्या भेटीनंतर समाजकार्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलली—हेमलकसा म्हणजे फक्त सेवा नव्हे, तर सहअस्तित्व आहे, हे त्यांना उमगले. आयुष्यात आलेल्या कठीण आव्हानांवर आपण आपल्या दृढ इच्छाशक्तीने, सकारात्मकतेने आणि सेवाभावाने मात करून पुन्हा तितक्याच ऊर्जेने समाजसेवेत सक्रिय राहिलात, ही बाब आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.आपण शिकवलेला धडा एकच—स्वतःसाठी नव्हे, तर इतरांसाठी जगणे.आपण दाखवलेल्या या मार्गावर चालण्याची प्रेरणा घेऊन, आज जळगावात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत ‘जळगाव प्रथम’ या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हीही समाजासाठी एक छोटासा, प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. परिस्थिती वेगळी असली तरी मूल्ये तीच आहेत—करुणा, जबाबदारी आणि माणुसकी. प्रकाश भाऊ, आपल्या वाढदिवसानिमित्त आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि या अद्वितीय कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच मन:पूर्वक सदिच्छा. हेमलकसाचा हा माणुसकीचा, करुणेचा आणि सहअस्तित्वाचा दीप आपण असाच उजळत ठेवा—तो दीप समाजालाच नव्हे, तर संपूर्ण सृष्टीला मार्ग दाखवत राहो.
आपला,
माजी आमदार
ॲड.जयप्रकाश बाविस्कर
जळगाव ता.जि.जळगाव

No comments