adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

‘गड आला पण सिंह गेला’! यावल नगराध्यक्षपदी छाया पाटील विजयी पती अतुल पाटील यांचा प्रभागात पराभव

  ‘गड आला पण सिंह गेला’! यावल नगराध्यक्षपदी छाया पाटील विजयी पती अतुल पाटील यांचा प्रभागात पराभव  भरत कोळी यावल ता प्रतिनिधी (संपादक -:- हेम...

 ‘गड आला पण सिंह गेला’! यावल नगराध्यक्षपदी छाया पाटील विजयी

पती अतुल पाटील यांचा प्रभागात पराभव 


भरत कोळी यावल ता प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला धक्का देत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या छाया अतुल पाटील यांना स्पष्ट कौल दिला आहे. भाजपच्या उमेदवार रोहिणी उमाकांत फेगडे यांचा तब्बल पाच हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला असून, या निकालामुळे यावलमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आमदार अमोल जावळे यांचा प्रभावही या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे दिसून आला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या निकालातील विशेष बाब म्हणजे नगराध्यक्षपदावर यश मिळवलेल्या छाया पाटील यांचे पती अतुल पाटील यांनाच मात्र प्रभाग क्रमांक ११ मध्ये पराभव स्वीकारावा लागला. या प्रभागातून हेमराज फडे यांनी सुमारे दोनशे मतांच्या फरकाने विजय मिळवला असून, ‘गड आला पण सिंह गेला’ अशी प्रतिक्रिया शहरात उमटताना दिसत आहे. यावल नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र विविध कारणांमुळे मतमोजणीला तब्बल १९ दिवसांचा विलंब झाला. अखेर रविवारी यावल तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतरीत्या पार पडली.

निकालानुसार छाया अतुल पाटील यांनी एकूण १४ हजार ५० मते मिळवत दणदणीत विजय नोंदवला, तर भाजपच्या उमेदवार रोहिणी फेगडे यांना त्यापेक्षा सुमारे पाच हजारांनी कमी मते मिळाली. मोठ्या मताधिक्यामुळे छाया पाटील यांचा विजय निर्विवाद ठरला असून, त्यांनी यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे.

विजयाची अधिकृत घोषणा होताच मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जोरदार घोषणाबाजीत उबाठा गटाच्या समर्थकांनी विजय साजरा केला. संपूर्ण यावल शहरात उत्साहाचे वातावरण पसरले होते. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली. या विजयामुळे यावल नगरपालिकेतील सत्तासमीकरणात मोठा बदल झाला असून, शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून छाया अतुल पाटील यांच्यावर आता शहराच्या सर्वांगीण विकासाची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे

No comments