राजकीय दबाव झुगारून आर्थिक गुन्हेगारांवर घाला घाला अमली पदार्थांचा विळखा तोडा!– पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पोलिसांना स्पष्ट इशारा ...
राजकीय दबाव झुगारून आर्थिक गुन्हेगारांवर घाला घाला अमली पदार्थांचा विळखा तोडा!– पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पोलिसांना स्पष्ट इशारा
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :-जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांतील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच जिल्ह्यात वाढलेला अमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर आणि निर्भीड कारवाई करावी, असे स्पष्ट व ठाम आवाहन जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डी येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलास प्रदान करण्यात आलेल्या २८ नवीन चारचाकी वाहनांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह पोलीस व प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून गुन्हेगार अत्याधुनिक शस्त्रे, इंटरनेट व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करत आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस दलाचे आधुनिकीकरण अत्यावश्यक आहे. जिल्ह्यात घडत असलेल्या विविध आर्थिक घोटाळ्यांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. त्यामुळे अशा प्रकरणांतील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस यंत्रणेने विशेष मोहिमा राबवाव्यात.
“कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, उपोषणासारख्या दबावतंत्रांना न घाबरता, सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांवर तात्काळ व कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
श्रीरामपूर येथील गोळीबाराची घटना तसेच देशविघातक कृत्य करणाऱ्या आरोपींच्या समर्थनार्थ जमणारा जमाव ही बाब समाजासाठी अत्यंत चिंताजनक असल्याचे नमूद करताना पालकमंत्री म्हणाले की, गुटखा, अवैध व्यवसाय व बेकायदेशीर धंद्यांतून येणारा काळा पैसा गुन्हेगारीला अधिक बळ देतो. जिल्ह्यात वाढत असलेला अमली पदार्थांचा सुळसुळाट आणि बेकायदेशीर शस्त्रांचा वावर रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक यंत्रणा व आवश्यक साधनसामग्री लागल्यास जिल्हा नियोजन निधीतून ती तत्काळ उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. शासनाचा भर केवळ वाहने देण्यापुरता मर्यादित नसून पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षित निवासासाठीही ठोस पावले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अहिल्यानगर शहरात ३२२ कोटी रुपये खर्चाचे पोलीस निवासस्थान संकुल उभारण्यात येत असून सायबर गुन्ह्यांचा वेळीच तपास व गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सर्व तालुक्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपविभागीय स्तरावर अत्याधुनिक ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगत, समृद्धी महामार्ग व इतर राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांवेळी मदतीसाठी ही नवीन वाहने अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माहिती देताना सांगितले की, मुंबई (२८ हजार गुन्हे) वगळता अहिल्यानगर जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे वर्षाला सुमारे १७ हजार गुन्हे नोंदवले जातात. हे प्रमाण पुणे व नागपूर शहरांपेक्षाही अधिक आहे. जिल्ह्याचा विस्तीर्ण भौगोलिक विस्तार तसेच शिर्डी, शनिशिंगणापूरसारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही वाहने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
विशेषतः महिलांची सुरक्षितता तसेच ‘११२’ आपत्कालीन क्रमांकावर येणाऱ्या कॉल्सना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी या वाहनांचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस दल जनसेवेसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
जिल्ह्यात कोपरगाव व पाथर्डी येथील नवीन पोलीस ठाण्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून राहाता, नेवासा व राहुरी येथील कामे प्रगतीपथावर आहेत. श्रीगोंदा व श्रीरामपूर येथील कामांनाही गती मिळाल्याने पोलीस प्रशासनाच्या पायाभूत सुविधांमध्ये लवकरच मोठी भर पडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपविभागीय महसूल अधिकारी माणिक आहेर, शिर्डी नगराध्यक्षा जयश्री थोरात, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

No comments