शहराची हवा भाजप–राष्ट्रवादी युतीच्या बाजूने...द ग्रेट खलींच्या एन्ट्रीमुळे भाजप–राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात रंगत सचिन मोकळं अहिल्यानगर ...
शहराची हवा भाजप–राष्ट्रवादी युतीच्या बाजूने...द ग्रेट खलींच्या एन्ट्रीमुळे भाजप–राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात रंगत
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आज एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळाली. जागतिक कीर्तीचे कुस्तीपटू द ग्रेट खली यांच्या नगर आगमनामुळे भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले. सकाळी ११ वाजता नगरमध्ये दाखल झाल्यानंतर खली यांनी सर्वप्रथम विशाल गणपतीचे दर्शन घेतले.
गणपती मंदिर ते दिल्ली गेटपर्यंत भव्य रॅली गणपती दर्शनानंतर गणपती मंदिर ते दिल्ली गेट या मार्गावर भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान द ग्रेट खली यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांना हात हलवून अभिवादन केले व थेट संवाद साधला. त्यांच्या साध्या, पण प्रभावी शब्दांनी नागरिक भारावून गेले. खलींना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. या रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.“नगरची हवा भाजप–राष्ट्रवादी युतीच्या बाजूने”
यावेळी बोलताना द ग्रेट खली यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. सध्या अहिल्यानगर शहराची हवा ही भाजप–राष्ट्रवादी युतीच्या बाजूने एकतर्फी असल्याचे दिसून येत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. नगर शहरातील पाणीटंचाई, रस्त्यांची अवस्था, रोजगार आणि सर्वांगीण विकास या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी भाजप–राष्ट्रवादी युतीला मतदान करण्याचे थेट आवाहन त्यांनी नागरिकांना केले. सक्षम नेतृत्व आणि विकासाभिमुख विचारांच्या जोरावरच शहराचा विकास साधता येईल, असा विश्वास खली यांनी व्यक्त केला.
युवकांना व्यायामाचा संदेश
द ग्रेट खली यांनी यावेळी युवकांना उद्देशून नियमित व्यायाम व शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. “युवक शारीरिकदृष्ट्या सक्षम असतील तर देशही सक्षम बनेल. भारताला विश्वगुरू बनवायचे असेल तर आरोग्य आणि शिस्त या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत,” असे सांगत त्यांनी तरुणांमध्ये जोश निर्माण केला.
डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांचे कौतुक खली यांनी डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यशैलीचे खुलेपणाने कौतुक केले. “शहराच्या प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका असून विकासासाठी ते सातत्याने मेहनत घेत आहेत. त्यांच्या कामातून सकारात्मक बदल दिसून येत आहेत. त्यामुळेच आज या रॅलीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रचाराला नवी दिशा
द ग्रेट खली यांच्या उपस्थितीमुळे अहिल्यानगरमधील निवडणूक प्रचाराला नवी दिशा मिळाली असून, आगामी निवडणुकीत भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीला याचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या भव्य रॅलीत डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

No comments