कामावरून काढल्याचा राग तरुणास अनावर..एमआयडीसीत कंपनी गेटवर राडा.. मॅनेजर सह कंत्राटदाराला कोयत्याने जिवे ठार मारण्याची धमकी सचिन मोकळं अहि...
कामावरून काढल्याचा राग तरुणास अनावर..एमआयडीसीत कंपनी गेटवर राडा.. मॅनेजर सह कंत्राटदाराला कोयत्याने जिवे ठार मारण्याची धमकी
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :-कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या चार साथीदारांसह थेट कंपनीच्या गेटवर धाव घेत कंत्राटदार व प्रोडक्शन मॅनेजरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना नागापूर एमआयडीसी परिसरात घडली. केवळ लाथाबुक्क्यांनी मारहाण करूनच न थांबता आरोपीने कोयत्याचा धाक दाखवत हातपाय तोडून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, निनाद श्रीहारी टीपुगडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी हे नागापूर एमआयडीसी येथील ‘सिध्दी फोर्ज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत कार्यरत आहेत. आरोपी नवनाथ अर्जुन उदमले (रा. हिवरे जरे, अहिल्यानगर) यास कंपनीने यापूर्वी कामावरून काढून टाकले होते. या कारणाचा राग मनात धरून रविवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास नवनाथ उदमले आपल्या चार अनोळखी साथीदारांसह थेट कंपनीच्या गेटवर पोहोचला.
आरोपींनी कंपनीच्या आवारात बेकायदेशीर प्रवेश करून फिर्यादी निनाद टीपुगडे, कंत्राटदार सदाशिव कुलकर्णी व प्रोडक्शन मॅनेजर राजेंद्र जाधव यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी तिघांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याच वेळी आरोपी नवनाथ उदमले याने सोबत आणलेल्या कोयत्याचा धाक दाखवत “तुमचे हातपाय तोडून तुम्हाला जिवे ठार मारतो,” अशी गंभीर धमकी दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कंपनी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.या प्रकरणी नवनाथ उदमले व त्याच्या चार साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार टेमकर करीत आहेत.

No comments