सामाजिक परिवर्तनाचा नवा इतिहास घडवणारा ठराव मंजूर...! बोधेगावात विवाहित-अविवाहित-विधवा-घटस्फोटित स्त्रियांना आता समान मानपान सचिन मोकळं अह...
सामाजिक परिवर्तनाचा नवा इतिहास घडवणारा ठराव मंजूर...! बोधेगावात विवाहित-अविवाहित-विधवा-घटस्फोटित स्त्रियांना आता समान मानपान
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :-जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे दिनांक १६/०१/२०२६ रोजी झालेल्या महिला मंडळाच्या बैठकीत सामाजिक परिवर्तनाचा नवा इतिहास घडवणारा ठराव मंजूर करण्यात आला.यापुढे गावात, वॉर्डात व विविध संस्थांमध्ये होणाऱ्या हळदीकुंकू तसेच सर्व सण-समारंभांमध्ये कोणताही भेद न करता विवाहित,अविवाहित, विधवा व घटस्फोटित अशा सर्व स्त्रियांना समानतेने सहभागी करून घेतले जाईल,असा ठराव एकमताने संमत करण्यात आला.
या बैठकीत ‘विधवा ही प्रथा अन्यायकारक असून ती सामाजिक पातळीवर नाकारली पाहिजे’ असा ठाम संदेश देत स्त्री समानतेचा स्पष्ट पुरस्कार करण्यात आला. स्त्रीचे अस्तित्व तिच्या वैवाहिक स्थितीवर अवलंबून नसून, ती एक स्वतंत्र, सन्माननीय व्यक्ती आहे, ही भूमिका उपस्थित महिलांनी एकमुखाने मांडली.
बोधेगावमधील समस्त महिलांच्या उपस्थितीत व उत्स्फूर्त सहभागाने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. हळदीकुंकू हा केवळ सौभाग्याशी जोडलेला समारंभ न राहता, समानता, सन्मान, माणुसकी, स्वाभिमान, आत्मसन्मान व एकतेचे प्रतीक असावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
“विधवा ही प्रथा म्हणजे स्त्रीवर लादलेली अन्यायकारक सामाजिक साखळी आहे. आज आपण ही साखळी तोडून सर्व स्त्रियांना समानतेने हळदीकुंकू लावून समतेची नवी परंपरा सुरू करूया,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. हा सण केवळ सौभाग्याचा नसून, तो स्त्रीच्या स्वाभिमानाचा आणि एकजुटीचा उत्सव असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या ऐतिहासिक ठरावाला संगीतातााई ढवळे (महिला जिल्हा अध्यक्ष),ॲड.कांचन बाळासाहेब बनसोडे, अर्चनाताई मोरे, आशा पांढरे, सारिका जंगम, नंदा ढवळे, प्रियांका अंगरख, पूजा अंगरख, सविता भोगले, मंदा भोसले, सरपंच अधोडी जयश्री खंडगळे, शीतल डोंगरे, नंदा भोगले, बेबी भोगले, प्रमिला मोरे, अनिता भोसले, प्रणाली भोगले, आशा भोगले, रत्नमाला भोगले, वंदना भोगले, संगीता खंडागळे, हाऊसाबाई भोगले, केसरबाई भोगले, शिला भोगले, अरुण भोगले, कुसुम भोगले, मीरा मोरे, मंदा भोगले यांच्यासह अनेक महिलांनी पाठिंबा दर्शवला.
कार्यक्रमाच्या शेवटी “विधवा प्रथा नाकारणारा आणि स्त्री सन्मान जपणारा समाज घडवू या” या निर्धाराने महिलांनी एकत्र येत समाजाला नवी दिशा देण्याचा संकल्प केला.


No comments