सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरावर चमकदार कामगिरी; धावण्याच्या स्पर्धेत विशेष यश अडावद प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोप...
सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरावर चमकदार कामगिरी; धावण्याच्या स्पर्धेत विशेष यश
अडावद प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा | महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन अमरावती येथे दि. ५ ते ८ डिसेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक, ठाणे, नागपूर व अमरावती या चारही विभागांतील विविध प्रकल्पांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल (जि. जळगाव) अंतर्गत येणाऱ्या चोपडा तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा, सनपुले येथील खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. वय वर्ष १७ आतील संघाने रिले (४×१०० मीटर) या क्रीडाप्रकारात प्रथम क्रमांक पटकावला, तर वय वर्ष १९ आतील संघाने रिले (४×४०० मीटर) स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. धावण्याच्या वैयक्तिक स्पर्धेत सयाराम मन्साराम बारेला (बडोले) याने २०० मीटर धावण्यात प्रथम, तर ४०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक मिळवून विशेष यश संपादन केले. रिले (४×१००) प्रकारात अनिल बदरसिंग आखाडे, पवन रेमा भिलाला व सयाराम मन्साराम बारेला (बडोले) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच रिले (४×४००) प्रकारात प्रवीण भिला बारेला व सखीराम नानुराम बारेला यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत चारही विभागांमधून नाशिक विभागाने सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. नाशिक विभागातील विविध प्रकल्पांपैकी यावल प्रकल्पाला एकूण ११८ गुण प्राप्त झाले असून, त्यापैकी सनपुले आश्रमशाळेने ३२ गुणांची महत्त्वपूर्ण भर घातली आहे. सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नाशिक विभागाच्या गुणतालिकेत मोठी मदत झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल अपर आयुक्त पावरा साहेब, प्रकल्पाधिकारी अरुण पवार, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव गणेश पाटील, सहाय्यक प्रकल्पाधिकारी प्रशांत माहुरे, पवन पाटील व संदीप पाटील, कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे, प्राथमिक मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक नितीन पाटील, क्रीडा शिक्षक ईश्वर पावरा, भूपेश पाटील तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.


No comments