राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यावल प्रकल्पाचा विजयाचा डंका; २२ पदके व ४ ट्रॉफींची घवघवीत कमाई भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकां...
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यावल प्रकल्पाचा विजयाचा डंका; २२ पदके व ४ ट्रॉफींची घवघवीत कमाई
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल | येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी अमरावती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत यावल प्रकल्पाचे नाव राज्यपातळीवर उज्वल केले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या यावल प्रकल्पाच्या ५० खेळाडूंपैकी तब्बल ४९ खेळाडूंनी पदकप्राप्त यश मिळवत घवघवीत यश संपादन केले. या राज्यस्तरीय स्पर्धेत यावल प्रकल्पाने वैयक्तिक क्रीडा प्रकारात सर्वाधिक २२ पदके, तर सांघिक क्रीडा प्रकारात ४ ट्रॉफी पटकावल्या आहेत. नाशिक विभागाने मिळविलेल्या एकूण ५२४ गुणांपैकी यावल प्रकल्पाने सर्वाधिक ११८ गुणांची महत्त्वपूर्ण भर घातली असून, नाशिक विभागाच्या यशात यावल प्रकल्पाचा सिंहाचा वाटा ठरला आहे.
आदिवासी विकास विभाग, नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा व यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील व संदीप पाटील यांच्या देखरेखीखाली यावल प्रकल्पातील क्रीडा शिक्षकांनी राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा काटेकोर व परिपूर्ण सराव करून घेतला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून हे मोठे यश साध्य झाले आहे.
स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांचा खो-खो संघ राज्यस्तरावर अजिंक्य ठरला, तर १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने ४×१०० मीटर रिले स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय १००, २००, ४००, ८०० मीटर धावणे, ५००० मीटर चालणे, लांब उडी, उंच उडी, थाळी फेक व भाला फेक अशा विविध वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही यावल प्रकल्पाच्या खेळाडूंनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. तसेच १७ व १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने ४×४०० मीटर रिले स्पर्धेत राज्यातून द्वितीय क्रमांक मिळवला. यावल प्रकल्पातील खेळाडू पिंगलाल दयाराम पावरा याला उत्कृष्ट धावपटू म्हणून आदिवासी विकास विभाग, अमरावतीच्या अपर आयुक्त आयुषी सिंग यांच्या हस्ते सायकल बक्षीस प्रदान करण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा, यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे, पवन पाटील, संदीप पाटील, मिनाक्षी सुलताने, जावेद तडवी, लेखाधिकारी दीपकांत वाघ, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे, एल. एम. पाटील, विश्वास गायकवाड, मिलिंद पाईकराव यांच्यासह यावल प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक, अधिक्षिका, गृहपाल व क्रीडा शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

No comments