कडाक्याच्या थंडीत ८ वर्षांच्या ओम भंगाळेने अरबी समुद्रात १७ किमी सागरी पोहणे केले यशस्वी इदू पिंजारी | फैजपूर संपादक हेमकांत गायकवाड फैजपू...
कडाक्याच्या थंडीत ८ वर्षांच्या ओम भंगाळेने अरबी समुद्रात १७ किमी सागरी पोहणे केले यशस्वी
इदू पिंजारी | फैजपूर
संपादक हेमकांत गायकवाड
फैजपूर येथुन जवळच असलेल्या न्हावी येथील मूळ रहिवासी व सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेला ओम कुणाल भंगाळे (वय ८ वर्षे) याने कडाक्याच्या थंडीत अरबी समुद्रात १७ किलोमीटरचे सागरी अंतर पोहत पार करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ओम हा ओमकार इंटरनॅशनल स्कूल, डोंबिवली येथील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी आहे. लहानपणापासूनच पोहण्याची आवड असलेल्या ओमने डोंबिवली येथील यश जिमखाना येथे प्रशिक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली औपचारिक जलतरण प्रशिक्षण सुरू केले. सुरुवातीचा संपूर्ण सराव हा केवळ स्विमिंग पूलमध्येच झाला होता. मात्र समुद्रात पोहण्याचे स्वप्न त्याच्या मनात कायम होते. पालकांच्या पूर्ण पाठिंब्याने एप्रिल २०२५ पासून ओमने या कठीण आव्हानासाठी तयारी सुरू केली. तो दररोज पहाटे चार तास नियमित सराव करत होता. या प्रवासात त्याला त्याच्या आजोबांची विशेष प्रेरणा लाभली. आजोबांसोबत पोहण्याची सुरुवात करत तो भविष्यातील कठीण प्रशिक्षणाकडे वळला. १९ डिसेंबर रोजी आजोबांचे निधन झाले असले तरी, त्यांच्या स्मृतींना उजाळा देत ओमने आपला सराव अखंड सुरू ठेवला. प्रशिक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओमने तीन समुद्री सराव सत्रे पूर्ण केली. त्यानंतर प्रशिक्षक विलास माने, संतोष पाटील आणि रवी नवले यांनी दररोज ३ ते ४ तास कठोर मेहनत घेऊन ओमला या सागरी मोहिमेसाठी सज्ज केले. ८ जानेवारी रोजी पहाटे ४.२३ वाजता अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडिया दरम्यान १७ किमी सागरी पोहण्याचा उपक्रम पार पडला. समुद्रदेवतेची पूजा करून, अंगाला ग्रीस लावून व महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या देखरेखीखाली ओमने अरबी समुद्रात उडी घेतली. अंधार, कडाक्याची थंडी, थंड वारे, मोठ्या जहाजांच्या लाटा तसेच समुद्रावर तरंगणारा तेलकट थर अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत ओमने धैर्याने पोहणे सुरू ठेवले. तब्बल २ तास ३३ मिनिटांत त्याने अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंतचे १७ किमी अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलेगेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचताच उपस्थित नागरिक, प्रशिक्षक व नातेवाईकांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. ओमच्या जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीला सर्वत्र सलाम होत आहे.
🔹 ओमचे पुढील ध्येय :
श्रीलंका ते भारत दरम्यानचे सुमारे ४० किमी सागरी अंतर पोहत पार करणे.

No comments