सौ तु ल कोळंबे शाळेच्या विद्यार्थ्यांची गरुड झेप..... शिकण्याच्या जिद्दीने मिळाली ऑक्सफर्डमध्ये अध्यापनाची संधी. प्रा.सतिश गायकवाड मुक्ता...
सौ तु ल कोळंबे शाळेच्या विद्यार्थ्यांची गरुड झेप.....
शिकण्याच्या जिद्दीने मिळाली ऑक्सफर्डमध्ये अध्यापनाची संधी.
प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर — जिद्द, सातत्य आणि अभ्यासाच्या बळावर मुक्ताईनगर येथील तरुण संशोधक हितेश पोतदार यांना जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात अध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. ही बाब मुक्ताईनगरसह परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हितेश पोतदार यांचे प्राथमिक शिक्षण मुक्ताईनगर येथील सौ. तु. ल. कोळंबे विद्यालयात झाले. लहानपणापासूनच अभ्यासात सातत्य राखत त्यांनी इयत्ता चौथीत शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले. माध्यमिक शिक्षण जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे पूर्ण केल्यानंतर, त्यांनी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.
यानंतर हितेश यांनी बी.ई. (मेकॅनिकल) पदवी पूर्ण करून मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) येथून उच्च शिक्षण घेतले. शिक्षणासोबतच त्यांनी शेती, कामगार प्रश्न, सार्वजनिक वित्त आणि विकासविषयक क्षेत्रांत विविध स्वरूपाचे काम केले आहे. आंध्र प्रदेश शासनाच्या वित्त विभागात त्यांनी सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
काम करत असतानाही अभ्यासाची ओढ कायम ठेवत, २०२३ साली त्यांनी किंग्ज कॉलेज ऑफ लंडन येथे पीएच.डी.साठी प्रवेश घेतला. सध्या ते इंटरनॅशनल डेव्हलपमेंट आणि जिओग्राफी या विभागात संशोधन करत असून, त्यांचा अभ्यास श्रम, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक वित्त या विषयांवर केंद्रित आहे. या अभ्यासासाठी त्यांना U.K. सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
पीएच.डी.चे शिक्षण सुरू असतानाच, डिसेंबर २०२५ पासून त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘Political Economy of the Internet’ या विषयासाठी अध्यापन सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ही संधी त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, संशोधन आणि अध्यापनातील रुचीमुळे मिळाल्याचे ते नमूद करतात.
संशोधनाबरोबरच हितेश हे लेखन क्षेत्रातही सक्रिय असून, कामगारांचे हक्क, श्रमप्रश्न आणि सामाजिक–आर्थिक विषयांवर ते मराठी व इंग्रजी भाषेत लेखन करतात. अभ्यास, संशोधन आणि सामाजिक प्रश्नांबाबतची संवेदनशीलता यांची सांगड घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मुक्ताईनगरसारख्या साध्या पार्श्वभूमीतून येऊन आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थेत पोहोचलेला हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सौ तु.ल. कोळंबे शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती सुरेखा राजाराम मुंडके यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन ॲड.सौ.रोहिणीताई खडसे- खेवलकर,संस्थेचे सचिव डॉ. सी.एस.चौधरी.स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम महाजन,श्री नारायण चौधरी, श्री महेश पाटील. मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा भारंबे ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी कौतुक केले.

No comments