कुसुमताई चौधरी जयंतीनिमित्त फैजपूर येथे जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धा सारिका प्रथम, कोहिनूर द्वितीय; सांगवी शाळेचे जिल्हास्तरावर यश तालुका ...
कुसुमताई चौधरी जयंतीनिमित्त फैजपूर येथे जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धा
सारिका प्रथम, कोहिनूर द्वितीय; सांगवी शाळेचे जिल्हास्तरावर यश
तालुका प्रतिनिधी: राहुल जयकर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कुसुमताई सांस्कृतिक मंच, फैजपूर यांच्या वतीने कुसुमताई चौधरी जयंतीनिमित्त दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी कुसुमताई माध्यमिक विद्यालय, फैजपूर येथे जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत ज्योती विद्या मंदिर, सांगवी बुद्रुक ता. यावल येथील दोन विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल व प्रभावी गायनाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत उल्लेखनीय यश संपादन केले.
पाचवी ते सातवी वयोगटात इयत्ता सातवीची विद्यार्थिनी सारिका सारंग तायडे हिने भावपूर्ण व तालबद्ध सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. तर आठवी ते दहावी वयोगटात इयत्ता दहावीचा विद्यार्थी कोहिनूर सारंग तायडे याने शास्त्रशुद्ध व प्रभावी गायन सादर करून द्वितीय क्रमांक मिळवला.
या यशामुळे ज्योती विद्या मंदिर, सांगवी बुद्रुक या शाळेचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले असून शाळा परिसरात आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गावकरी, पालकवर्ग तसेच विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. भंगाळे, पर्यवेक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असून कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्रोत्साहन दिले जाते, असे यावेळी सांगण्यात आले.
कोहिनूर व सारिका हे बहिण-भाऊ असून दोघांनाही गायनकलेची उपजत देणगी लाभली आहे. सातत्यपूर्ण सराव, कुटुंबीयांचे पाठबळ आणि शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाल्याचे मार्गदर्शक शिक्षक श्री. पंकज भंगाळे यांनी सांगितले. भविष्यात हे दोघेही संगीत क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


No comments