रिव्हॉल्वर हलगर्जीपणे हाताळल्याचा ठपका;दोन पोलीस अंमलदार निलंबित अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेश सचिन मोकळं अहिल्यानगर ...
रिव्हॉल्वर हलगर्जीपणे हाताळल्याचा ठपका;दोन पोलीस अंमलदार निलंबित अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेश
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- शहराचे आमदार संग्राम जगताप यांना सुरक्षा देणारे दोन पोलीस बॉडीगार्ड कर्तव्यात कसूर व शस्त्र हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबतचे आदेश काढले असून,नीलेश भालसिंग व राघवेंद्र भालसिंग अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांची नावे आहेत.या दोन्ही पोलीस अंमलदारांवर कर्तव्याचे ठिकाण सोडून बोल्हेगाव परिसरात जाणे तसेच जवळील रिव्हॉल्वर चुकीच्या व हलगर्जी पध्दतीने हाताळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण वातावरण असताना, अशा प्रकारे शस्त्राचा गैरवापर किंवा निष्काळजीपणा केल्याचा आरोप गंभीर मानण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाजमाध्यम ‘एक्स’वर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये एका पोलिसाच्या हातामध्ये रिव्हॉल्वर स्पष्टपणे दिसत असून, तो महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांच्या घरासमोर असल्याचा आरोप करण्यात आला होता.हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची दखल घेत खासदार नीलेश लंके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी (6 जानेवारी) सायंकाळी पोलीस अधीक्षक घार्गे यांची भेट घेतली. पोलिसांकडून चुकीच्या पध्दतीने रिव्हॉल्वरचा वापर करण्यात आल्याचा आरोप करून संबंधित पोलीस अंमलदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.
या भेटीनंतर व व्हिडीओमधील दृश्यांच्या आधारे प्राथमिक चौकशी करून पोलीस अधीक्षक घार्गे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. आ. जगताप यांचे बॉडीगार्ड म्हणून नेमणूक असलेले आणि व्हिडीओमध्ये दिसून येणारे पोलीस अंमलदार नीलेश भालसिंग व राघवेंद्र भालसिंग यांना निलंबित करण्यात आले आहे. हे दोघेही पोलीस मुख्यालयात नेमणुकीला होते.

No comments