इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, धरणगावची शैक्षणिक–निसर्ग–देवस्थान–ऐतिहासिक सहल उत्साहात संपन्न विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायक...
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, धरणगावची शैक्षणिक–निसर्ग–देवस्थान–ऐतिहासिक सहल उत्साहात संपन्न
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, निसर्ग, देवस्थान व ऐतिहासिक सहलीचे आयोजन करण्यात आले. सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या सहलीने विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धक, अनुभवसमृद्ध व आनंददायी क्षण दिले.
सहलीची सुरुवात गुजरात राज्यातील कुबेर भंडार मंदिराच्या दर्शनाने झाली. मंदिरातील महाप्रसादाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. त्यानंतर नर्मदा नदीमार्गे प्रवास करत विद्यार्थी पोईचा येथील नीलकंठ धाम येथे पोहोचले. येथे सर्व विद्यार्थ्यांनी महाप्रभू स्वामीनारायणांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. मंदिराचे भव्य नक्षीकाम व शांत, पवित्र वातावरण पाहून विद्यार्थी भारावून गेले.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी नीलकंठ धाम येथील ‘सहजानंद युनिव्हर्स’ (गार्डन) ला भेट दिली. हे गुजरातमधील एक भव्य थीम पार्क व सांस्कृतिक केंद्र असून येथे भारतीय संस्कृती, परंपरा, विज्ञान व अध्यात्म यांचा सुरेख संगम अनुभवता येतो.
येथील प्रमुख आकर्षणांमध्ये १५१ फूट उंच भगवान श्री स्वामीनारायण यांची भव्य मूर्ती, संस्कृती ब्लॉक, सायन्स सिटी, अॅम्युझमेंट पार्क, अॅक्वेरिअम, हॉरर हाऊस, थीम गार्डन्स, बोटिंग, भुलभुलय्या तसेच ३D लाईट अँड साउंड शो यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी निसर्गसौंदर्याचा व मनोरंजनाचा मनोहारी अनुभव घेतला.
संध्याकाळी सर्व विद्यार्थी नीलकंठ धाम येथील तीर्थालयात मुक्कामी थांबले. १५० विद्यार्थ्यांसाठी ४० खोल्यांची व्यवस्था करण्यात आली होती. निसर्गरम्य व शांत वातावरणात राहण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंददायी ठरला. दुसऱ्या दिवशी सकाळी भोजनालयात चहा-नाश्ता करून सर्वजण स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे रवाना झाले.
स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पोहोचल्यावर विद्यार्थ्यांनी एकता क्रूझचा आनंद घेतला. त्यानंतर जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. व्ह्यूइंग गॅलरीतून निसर्गरम्य दृश्य पाहिले तसेच पुतळ्याच्या निर्मितीविषयी, त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याबद्दल व सरदार पटेल यांच्या जीवनकार्याविषयी सविस्तर माहिती मिळाली. विद्यार्थी ही माहिती मोठ्या उत्सुकतेने ऐकत होते.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी जंगल सफारीला भेट देत विविध प्रकारचे प्राणी पाहिले व त्यांच्याविषयी माहिती घेतली. हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत रोमांचक ठरला.
ही सहल राज्य परिवहन महामंडळ, एरंडोल यांच्या चार ‘लालपरी’ (बी.एस. सिक्स) बसद्वारे सुरक्षित व आरामदायी पद्धतीने पार पडली. सहलीचा कालावधी दोन दिवस व तीन रात्र असा असून तिसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता सर्व विद्यार्थी विद्यालयात सुखरूप परतले.
मुख्याध्यापिका सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल यशस्वीरीत्या पार पडली. सहलप्रमुख पंकज कोळी व उपशिक्षिका आरती जैन यांनी उत्कृष्ट नियोजन केले. सहल यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक ए. एस. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील, संचालक मच्छिंद्र पाटील व संचालक भरत पाटील यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे कौतुक केले.

No comments