पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे ‘आर्ट शेप्स द फ्युचर’ वार्षिक कला प्रदर्शन उत्साहात संपन्न भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प...
पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे ‘आर्ट शेप्स द फ्युचर’ वार्षिक कला प्रदर्शन उत्साहात संपन्न
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे ‘आर्ट शेप्स द फ्युचर’ या संकल्पनेवर आधारित वार्षिक कला प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळी ८.३० वाजता शाळेच्या प्रांगणात आयोजित या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रदर्शनाच्या प्रारंभी शाळेचे प्राचार्य श्री. सचिन बनसोडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रिबीन कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अतुल माळखेडे सर (प्राचार्य, सप्तपुत ललित कला महाविद्यालय, खिरोदा) आणि श्री. निरंजन शेलार (प्राचार्य, शिवछत्रपती शिवाजी महाराज चित्रकला महाविद्यालय, जळगाव) उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती पाच प्रमुख क्लस्टरमध्ये सादर केल्या. त्यामध्ये कलर अँड मूड डिझायनर, वर्ल्ड बिल्डर्स, व्हिज्युअल स्टोरीटेलर्स, कल्चरल क्रिएटर्स तसेच मटेरियल अँड टेक्स्चर मेकर्स या विभागांचा समावेश होता. प्रत्येक क्लस्टरमध्ये विद्यार्थ्यांची कल्पकता, सर्जनशीलता आणि भविष्याभिमुख विचार स्पष्टपणे दिसून आला.
या कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन विभाग, पालकांसाठी फीडबॅक झोन, आकर्षक सेल्फी कॉर्नर तसेच खेळ व उपक्रमांसाठी विशेष वर्गाची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या निवडक कलाकृतींचा रॅम्प वॉक घेण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला. शाळेच्या वतीने प्रसिद्ध कलाकार श्री. निरंजन शेलार यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर व पालकांसमोर थेट लाईव्ह पोर्ट्रेट्स साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेचे आदरणीय प्राचार्य श्री. सचिन बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “कला ही केवळ छंद नसून ती विचार करण्याची क्षमता वाढवते आणि व्यक्तिमत्त्व घडवते. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांवर विश्वास ठेवून सतत नवे प्रयोग करावेत. चुका झाल्या तरी त्यातून शिकत पुढे जा, कारण सर्जनशीलतेतूनच उज्ज्वल भविष्य घडते.” एकूणच हे वार्षिक कला प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारे, आत्मविश्वास वृद्धिंगत करणारे आणि पालकांसाठीही प्रेरणादायी ठरले


No comments