ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा यावल तालुका प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ज्...
ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा
यावल तालुका प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ज्योती विद्या मंदिर, सांगवी बुद्रुक (ता. यावल) येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजामाता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी रेड रिबन क्लब व ग्रामीण रुग्णालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने NCC कॅडेट्ससाठी १०० मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात NCC अधिकारी श्री. पी. एम. भंगाळे यांनी राष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व विशद केले. युवकांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती व सेवाभाव निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” हा स्वामी विवेकानंदांचा संदेश आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. धावण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. अतुल फिरके यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
स्पर्धेच्या निकालात मुलींच्या गटात वैष्णवी प्रकाश कोळी हिने प्रथम, हेमांगी सुपडू कोळी हिने द्वितीय तर नेहा विकास चौधरी हिने तृतीय क्रमांक पटकावला. मुलांच्या गटात प्रणय भूषण पाटील प्रथम, अंश दिनकर सोनवणे द्वितीय व ज्ञानेश खिलचंद चौधरी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्या व सहभागी NCC कॅडेट्सचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. भंगाळे यांनी केले. यावेळी श्री. वसंत संदानशिव (समुपदेशक, ICTC विभाग), श्री. पवन जगताप (लिंक वर्कर), श्रीमती कांचन चौधरी (समुपदेशक, RKSK), ग्रामीण रुग्णालय यावलचे पर्यवेक्षक श्री. सी. पी. फिरके तसेच भाऊसाहेब सतीश सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व विजेत्या कॅडेट्सना ट्रॉफी व प्रमाणपत्र, तर सहभागी कॅडेट्सना सहभाग प्रमाणपत्र रेड रिबन क्लबच्या वतीने देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार NCC कॅडेट तौसिफ तडवी यांनी मानले.

No comments