मनोबल अभ्यासिकेत तहसीलदार समाधान सोनोने यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:...
मनोबल अभ्यासिकेत तहसीलदार समाधान सोनोने यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दि. १७/०१/२०२६ रोजी मलकापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या मनोबल शेतकरी कन्या-पुत्र अभ्यासिका येथे एका छोटेखानी पण प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मलकापूरचे तहसीलदार श्री. समाधान सोनोने यांनी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात तहसीलदार समाधान सोनोने यांनी स्वतः स्पर्धा परीक्षा देत असताना आलेले अनुभव सांगितले. कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्य हेच यशाचे खरे गमक असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. योग्य नियोजन, अभ्यासाची शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. तसेच भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण नेहमी तत्पर राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमात नुकतेच मनोबल अभ्यासिकेतून मार्गदर्शन घेऊन सरकारी सेवेत रुजू झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये विकास खोडके (CISF), शुभम दही (SSB), विकास काळे (SSB), आदित्य वाघ (BSF), तुषार तळेकर (विद्युत सहायक) आणि प्रतीक मारवडे (BSF) यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार समाधान सोनोने हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयभाऊ काजळे हे उपस्थित होते. तसेच सुभाषराव पाटील (संचालक, कृ. उ. बा. समिती), राधेश्याम शर्मा (सचिव), राजुभाऊ गावंडे, पहाडसिंग दादा सुरळकर, चंद्रशेखर तायडे, अजय तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय बोचरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौरभ पाटील यांनी केले. मनोबल अभ्यासिकेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्यांना नवी दिशा मिळाल्याचे दिसून आले.

No comments