प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील कथित घोटाळ्याप्रकरणी निलंबनाची मागणी कारवाई न झाल्यास १२ जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा लातूर जि प्रत...
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील कथित घोटाळ्याप्रकरणी निलंबनाची मागणी
कारवाई न झाल्यास १२ जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा
लातूर जि प्रतिनिधी : उत्तम माने
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा तालुक्यातील मौजे दापका व मुबारकपूर येथे सन 2023 ते 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या रमाई, इंदिरा व प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता व घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित जबाबदार व्यक्तींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शासनाच्या घरकुल योजनांचा उद्देश गोर-गरीब, बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना पक्के घर उपलब्ध करून देण्याचा आहे. मात्र संबंधित गावांमध्ये या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजू लाभार्थ्यांना न देता, आधीच पक्की घरे असलेल्या व काही प्रकरणांत बांधकामासाठी जागा नसलेल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांना देण्यात आल्याचा आरोप आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सन 2023 ते 2025 या कालावधीत कोणतीही वैध कागदपत्रे (८/अ इत्यादी) नसताना प्रत्येक नागरिकाकडून सुमारे 10 हजार रुपये घेऊन घरकुल मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच घरकुलाच्या अनुदानातून प्रत्यक्ष बांधकाम न करता, कोणतेही बांधकाम फोटो किंवा प्रत्यक्ष काम न होता अनुदानाची रक्कम चुकीच्या पद्धतीने वितरित केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आजपर्यंत कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली नसून, गोर-गरीब नागरिकांची होणारी आर्थिक लूट अद्याप थांबलेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास भीम आर्मी सेनेच्या वतीने दि. 12 जानेवारी 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, निलंगा येथे अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

No comments