कंदुरीत थरार! क्षुल्लक वादातून गोळीबार २३ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यान...
कंदुरीत थरार! क्षुल्लक वादातून गोळीबार २३ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. ११) सायंकाळी कंदुरीच्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादाचे थेट गोळीबारात रूपांतर झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.चांदा गाव शिवारात घडलेल्या या धक्कादायक घटनेत शाहिद राजमोहम्मद शेख (वय २३, रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) या तरुणावर अज्ञात इसमांनी गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,चांदा गाव शिवारात कंदुरीचा कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.हा वाद पाहता-पाहता तीव्र होत गेला. वादाच्या भरात एकाने बंदुकीतून शाहिद शेख याच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्याने शाहिद रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला.गोळीबाराची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली. शाहिद शेख याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले;मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेनंतर चांदा गावासह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.

No comments