कृषी उत्पन्न बाजार समितीत नियमबाह्य भंगार विक्री? शहरात खळबळ अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विदर्भाच्या प्रवेशद्वारावर ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत नियमबाह्य भंगार विक्री? शहरात खळबळ
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विदर्भाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, मलकापूर येथे गंभीर स्वरूपाच्या गैरव्यवहाराची चर्चा सध्या शहरभर जोर धरू लागली आहे. बाजार समितीतील भंगार साहित्याची विक्री कोणतीही अधिकृत वृत्तपत्र जाहिरात, निविदा प्रक्रिया किंवा पारदर्शक नियम न पाळता करण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप नागरिकांमधून होत आहे.
शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार भंगार किंवा मालमत्तेच्या विक्रीसाठी खुली निविदा, प्रसिद्ध वृत्तपत्रात जाहिरात आणि स्पर्धात्मक दर प्रक्रिया बंधनकारक असते. मात्र, या सर्व नियमांना हरताळ फासून मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी परस्पर व्यवहार करण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
या कथित व्यवहारामुळे बाजार समितीचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले का?, तसेच कुणाच्या आशीर्वादाने ही विक्री करण्यात आली? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेतच जर पारदर्शकतेचा बोजवारा उडत असेल, तर शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाणे साहजिक आहे.
या प्रकरणात संबंधित अधिकारी, संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद मानली जात असून, याकडे जिल्हा उपनिबंधक, बाजार समिती विभाग व जिल्हा प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरातील नागरिक व शेतकरी संघटनांकडून तत्काळ चौकशी करून संपूर्ण भंगार विक्री प्रक्रिया रद्द करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी व आर्थिक व्यवहारांची लेखापरीक्षा करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
या प्रकरणावर संबंधित बाजार समिती प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments