हत्याकांडाचा उलगडा!बंटी जहागीरदार खून प्रकरणी दोन हल्लेखोर ताब्यात..सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांची धडाकेबाज कारवाई सचिन मोकळं अहिल्य...
हत्याकांडाचा उलगडा!बंटी जहागीरदार खून प्रकरणी दोन हल्लेखोर ताब्यात..सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१):-श्रीरामपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या अस्लम शेख उर्फ बंटी जहागीरदार हत्या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत उलगडा करत पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे.या प्रकरणात रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.काल रात्री श्रीरामपूर शहरात गोळीबार करून बंटी जहागीरदार याची निर्घृण हत्या करण्यात आली होती.ही घटना घडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.विशेष म्हणजे मृत बंटी जहागीरदार हा पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असल्याने या हत्येने राज्यभरात खळबळ निर्माण झाली होती.घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासण्यात आले. त्याआधारे संशयितांची ओळख पटवून शहरात व परिसरात नाकाबंदी करण्यात आली. याच नाकाबंदी दरम्यान रात्री उशिरा रवी निकाळजे व कृष्णा शिंगारे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसी चौकशीत दोन्ही आरोपींनी बंटी जहागीरदार याच्यावर गोळीबार करून हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे समजते. प्राथमिक तपासात जुन्या वादातून हा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, यामागील नेमके कारण, कटात आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच वापरलेले शस्त्र कुठून आणले,याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून असून,लवकरच संपूर्ण हत्याकांडाचा पर्दाफाश होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.दरम्यान,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बंटी जहागीरदारच्या हत्येमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments