जिद्दीच्या बळावर टीईटी यश; लासुरच्या नंदिनी सपकाळेचा प्रेरणादायी प्रवास विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासुर (ता. चोपडा) ...
जिद्दीच्या बळावर टीईटी यश; लासुरच्या नंदिनी सपकाळेचा प्रेरणादायी प्रवास
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लासुर (ता. चोपडा) येथील पंचशील नगरमधील रहिवासी कु. नंदिनी राजाराम सपकाळे हिने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2025 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे तिने इयत्ता पहिली ते पाचवी तसेच सहावी ते आठवी या दोन्ही स्तरांच्या टीईटी परीक्षांमध्ये यश मिळवून आपल्या जिद्दीचा ठसा उमटवला आहे.
नंदिनीची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर आई मोलमजुरी करून घरचा उदरनिर्वाह व मुलींचे शिक्षण सांभाळत आहे. तीन बहिणी व एक भाऊ अशा कुटुंबात प्रसंगी शेतमजुरी करत नंदिनीने शिक्षणाची कास धरली आणि अखेर आपल्या कष्टांचे चीज केले.
तिने जिल्हा परिषद मराठी शाळेत मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत दहा महिने सेवा दिलेली आहे. या अनुभवासह कठोर परिश्रम, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर तिने टीईटी परीक्षेत हे यश मिळवले.
नंदिनीच्या या यशाबद्दल लासुरच्या सरपंच नर्मदाबाई भील, किसान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल हिम्मतराव पाटील, माळी समाजाचे राज्याध्यक्ष प्रा. ए. के. गंभीर, चोपडा सुतगिरणीचे संचालक अमृतराव वाघ, चोपडा शेतकी संघाचे संचालक नारायण पाटील, राजकन्या पाटील (माजी सरपंच), देवीलाल बाविस्कर तसेच श्री नाटेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप पालीवाल, ह. भ. प. बापू महाराज आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments