मनपा स्वीप समितीतर्फे "तू खींच मेरी फोटो" मतदान सेल्फी स्पर्धेचे आयोजन..मतदान कार्डासह सेल्फी पाठवण्यासाठी परिवार, संस्था आणि संघ...
मनपा स्वीप समितीतर्फे "तू खींच मेरी फोटो" मतदान सेल्फी स्पर्धेचे आयोजन..मतदान कार्डासह सेल्फी पाठवण्यासाठी परिवार, संस्था आणि संघटनांना आवाहन
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१०):-महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी मनपा स्वीप समितीच्या वतीने "तू खींच मेरी फोटो" या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परिवार, संस्था, संघटना, विविध ग्रुप्स आणि बचत गट यांना मतदान कार्डासह सेल्फी काढून पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने मतदारांनी आपल्या घरातील सर्व सदस्यांचे राष्ट्रीय मतदार ओळखपत्र (Voter Card/EPIC) आजच शोधून सज्ज ठेवावे. हे ओळखपत्र हातात धरून कुटुंबातील सदस्यांचा ग्रुप फोटो किंवा वैयक्तिक फोटो काढायचा आहे. तसेच, मतदानासाठी इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी हा फोटो स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर करायचा आहे.तसेच, मतदानानंतर शाई लावलेले बोट दाखवत सेल्फी काढून तो देशातील पहिल्या 'अहिल्यानगर मनपा स्वीप केअर'च्या ८०५५८०९३९४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर १६ जानेवारी २०२६ पर्यंत स्वतःच्या संपूर्ण नावासह पाठवायचा आहे. सहभागी सर्व मतदार आणि ग्रुप्सना सहभागाचे प्रमाणपत्र व विशेष पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे."जगातील सर्वात सक्षम लोकशाही असलेल्या भारताच्या मनपा निवडणूक उत्सवात शहराच्या सशक्त उभारणीसाठी प्रत्येकाने हिरीरीने सहभागी व्हावे. स्वतःला व समाजाला अभिमान वाटेल असे मतदान करावे," असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.जास्तीत जास्त मतदारांनी "तू खींच मेरी फोटो" या उपक्रमात सहभागी होऊन शंभर टक्के मतदान करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा व मेहेर लहारे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे, प्रशासनाधिकारी जुबेर पठाण आणि मतदारदूत डॉ. अमोल बागुल यांनी केले आहे.

No comments