ओलसर डोळे… आणि कुणालाच न दिसलेली वेदना संकलन:- शामसुंदर सोनवणे हातेड/चोपडा मो.8208449983 काही आयुष्यं अशी असतात, ज्यांच्या वेदनांना शब्...
ओलसर डोळे… आणि कुणालाच न दिसलेली वेदना
![]() |
संकलन:- शामसुंदर सोनवणे हातेड/चोपडा मो.8208449983 |
काही आयुष्यं अशी असतात, ज्यांच्या वेदनांना शब्द नसतात…
त्या फक्त डोळ्यांत साचतात. आणि डोळे ओलावले,
की समाज त्याला “कमजोरी” म्हणतो. पण खरं सांगायचं झालं तर,या ओलसर डोळ्यांमागे अखंड संघर्षाचं एक मोठं आकाश दडलेलं असतं.
सकाळ होते… घरात चूल पेटते, पण पोट भरण्याची खात्री नसते. आई ताटात वाढताना हसते, पण तिच्या डोळ्यांत काळजी ठासून भरलेली असते. वडील बाहेर पडतात,
पण त्यांच्या पावलांत थकवा असतो, जो कुणालाच दिसत नाही. काही मुलं खेळण्यात रमलेली असतात, तर काही मुलं लहान वयातच जबाबदाऱ्यांचं ओझं उचलतात. शाळेची वही हातात असते, पण डोक्यात घर चालवण्याची चिंता असते.
स्वप्नं असतात… पण ती झोपेतही पूर्ण होत नाहीत. कारण गरिबी स्वप्नांनाही हिशोब लावायला शिकवते. रात्री झोप येत नाही, कारण उद्याचा दिवस आजपेक्षा कठीण असणार, याची जाणीव मनाला टोचत राहते. समाज म्हणतो – “मेहनत केली तर सगळं मिळतं.” पण समाज हे विसरतो की, काही जखमा मेहनतीने ही भरून येत नाहीत.
एखादं अपयश आलं, की बोटं उभी राहतात.
एखादं यश आलं, की विचारतात – “कुणाच्या जोरावर?” पण कुणीच विचारत नाही…“या यशामागे किती अश्रू सांडले?” आईचं पदरात लपलेलं दुःख, वडिलांची न बोललेली हार, आणि मुलांचं दाबलेलं रडणं… हे सगळं मिळून एक शांत घर तयार होतं. शांत… पण आनंदी नाही. कधी कधी वाटतं, देवाने जर थोडं लक्ष दिलं असतं, तर काही माणसं आज स्वतःसाठी तरी जगली असती.
पण तरीही ही माणसं तुटत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं – आपण कोसळलो, तर आपल्या मागे उभं असलेलं
संपूर्ण कुटुंब कोसळेल. हा लेख एखाद्या एका व्यक्तीचा नाही… हा लेख आहे त्या प्रत्येकाचा, जो हसत-हसत जगतो, पण आतून रोज मरतो. आज एखाद्या शांत माणसाला पाहिलंत, तर लगेच निष्कर्ष काढू नका. कारण कदाचित… त्याच्या शांततेमागे आयुष्यभराची वेदना उभी असेल. आणि हो… कधी जमलं तर, त्या माणसाला एक शब्द बोला. कारण कधी कधी एक शब्दसुद्धा जगण्याचं कारण बनतो.

No comments