आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी दिलीप नेवे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा शहर पोल...
आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी दिलीप नेवे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहर पोलिस स्टेशन, जिल्हा जळगाव येथे नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक ०१/२०२६ मधील आरोपी दिलीप लक्ष्मण नेवे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता,२०२३ मधील कलम १९६(१)(अ),३५३(२),३५६(२) व ३५६(३) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
जामिनासाठी अर्ज आरोपीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ च्या कलम ४८३ अंतर्गत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आपण निर्दोष असून या प्रकरणात खोट्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा दावा करत, शारीरिक कोठडीची गरज नसल्याचे कारण देत जामिनाची मागणी करण्यात आली होती.
सरकारी पक्षाचा कडाडून विरोध
तपास अधिकारी व सहाय्यक सरकारी वकिलांनी न्यायालयात आपले उत्तर सादर करत सांगितले की,आरोपीविरुद्ध समाजात तीव्र नाराजी आहे.आरोपी जामिनावर सुटल्यास चोपडा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच तपासात अडथळा आणण्याची व पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नेमका काय आहे आरोप?
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी व तक्रारदार हे फेसबुकवरील कॉमन फ्रेंड्स आहेत. ३ जानेवारी २०२६ रोजी आरोपीने फेसबुकवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.सदर पोस्ट दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारी व विशिष्ट धर्माविरोधात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
न्यायालयाचे निरीक्षण
न्यायालयाने नमूद केले की, पोलिस तपास अहवालानुसार आरोपीची या गुन्ह्यात सक्रिय भूमिका दिसून येते. जरी हे गुन्हे न्यायदंडाधिकारी न्यायालयात चालवता येण्याजोगे असले, तरी कलम १९६(१)(अ) हा गुन्हा अजामीनपात्र आहे.
तपासादरम्यान आरोपीने वापरलेला मोबाईल अद्याप जप्त झालेला नसून, साक्षीदारांचे जबाब नोंदवणे व अन्य महत्त्वाचे पुरावे गोळा करणे बाकी आहेत.अशा स्थितीत आरोपीला जामिनावर सोडल्यास तपासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाचा आदेश या सर्व बाबींचा सखोल विचार करून न्यायालयाने आरोपी दिलीप लक्ष्मण नेवे यांचा जामीन अर्ज फेटाळला, संबंधित आदेशाची माहिती चोपडा शहर पोलिस स्टेशनला देण्याचे निर्देश दिले.

No comments