पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौक बनलाय अपघातांचा सापळा..!दररोज वाहतूक कोंडी, भांडणं अन् धडक पण शहर वाहतूक शाखेला अजिबात वेळ नाही! एखादी मोठी द...
पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौक बनलाय अपघातांचा सापळा..!दररोज वाहतूक कोंडी, भांडणं अन् धडक पण शहर वाहतूक शाखेला अजिबात वेळ नाही! एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच वाहतूक शाखेला जाग येणार का?”
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- शहरातील सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौक हे एक अत्यंत वर्दळीचे आणि महत्त्वाचे ठिकाण असून,येथे सातत्याने वाहतुकीची भीषण कोंडी होत असल्याचे चित्र रोज पाहायला मिळत आहे. सकाळी कार्यालयीन वेळ,दुपारी बाजारपेठेची गर्दी आणि सायंकाळी शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळेत या चौकात वाहनांची अक्षरशः रांगच रांग लागते.मात्र,एवढ्या महत्त्वाच्या चौकात शहर वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.परिणामी, वाहतुकीचे कोणतेही नियोजन नसल्याने चारही बाजूंनी येणारी वाहने एकमेकांत अडकून पडतात,आणि याच गर्दीतून लहान-मोठे अपघात,गाड्यांना धडक,तसेच वाहनचालकांमध्ये वाद-विवादाचे प्रकार वारंवार घडत आहेत.विशेष म्हणजे, अपघात किंवा वाद निर्माण झाल्यानंतरही वाहतूक पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहोचत नाहीत,त्यामुळे नागरिकांनाच मध्यस्थी करावी लागते.अनेक वेळा किरकोळ धडक मोठ्या भांडणात रूपांतरित होत असून, वाहनचालकांचा वेळ, संयम आणि सुरक्षितता तिन्ही धोक्यात येत आहेत.स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की,शहर वाहतूक शाखेतील काही कर्मचारी प्रत्यक्ष वाहतूक नियमनाकडे दुर्लक्ष करून रिक्षा,पियागो चालकांना पकडण्यातच अधिक व्यस्त असून मलिदा लाटण्याच्या तयारीत असतात.महत्त्वाच्या चौकात कोंडी सुटावी,अपघात टळावेत यासाठी कर्मचारी नेमण्याऐवजी,कारवाईचा सोपा मार्ग निवडला जात असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.भिस्तबाग चौकातून रुग्णवाहिका,शाळेची वाहने, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या अडचणीतून मार्ग काढतात,मात्र तरीही प्रशासन डोळेझाक करत असल्याचे दिसते. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच वाहतूक शाखेला जाग येणार का?” असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.या चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्त करणे,सिग्नलचे नियोजन करणे आणि अतिक्रमण हटवणे अत्यंत गरजेचे असतानाही,शहर वाहतूक शाखेचे याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून भिस्तबाग चौकातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा येत्या काळात येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही—अशी स्पष्ट मागणी सावेडीतील नागरिकांकडून केली जात आहे.

No comments