खडसे महाविद्यालयात एकदिवसीय सॉफ्टबॉल क्रीडा मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न सतिश गायकवाड मुक्ताईनगर: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
खडसे महाविद्यालयात एकदिवसीय सॉफ्टबॉल क्रीडा मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
सतिश गायकवाड मुक्ताईनगर:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे दिनांक २४ जानेवारी २०२६ (शनिवार) रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर – क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय सॉफ्टबॉल क्रीडा मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल, कोथळी (भुसावळ रोड) येथे करण्यात आले. या कार्यशाळेस मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून प्रो. डॉ. गोविंद मारतळे, क्रीडा संचालक, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर हे उपस्थित होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. ए. एच. महाजन, उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अतुल बढे, क्रीडा समिती सदस्य प्रा. एस. एन. पाटील तसेच डॉ. संतोष थोरात उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. गोविंद मारतळे यांनी सॉफ्टबॉल खेळाचे महत्त्व विशद करताना प्रथम शरीर व मनाच्या सुदृढतेचे महत्त्व सांगितले. ‘शरीर माध्यमं खलु धर्म साधनम’ या उक्तीचा संदर्भ देत तसेच संत कबीरांच्या दोह्याच्या माध्यमातून आरोग्याचे महत्त्व स्पष्ट केले. केवळ धनसंपत्ती असून उपयोग नाही, जर शरीर सुदृढ नसेल, असे सांगून खेळाडू घडण्यासाठी समर्पण, सातत्य व मेहनत किती आवश्यक आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. महाजन यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्टबॉल खेळाचे शास्त्रशुद्ध ज्ञान, योग्य सराव व खेळाची समज विकसित करून उच्चतम कामगिरी साधावी, असे आवाहन केले. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास घडवावा, असेही त्यांनी नमूद केले.
यानंतर प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्रात डॉ. मारतळे यांनी सॉफ्टबॉल खेळाची शास्त्रोक्त माहिती, खेळाचा इतिहास तसेच जळगाव जिल्ह्यातील सॉफ्टबॉल खेळाची यशस्वी परंपरा सांगितली. खेळातील मूलभूत कौशल्यांची ओळख करून देण्यात आली. दुसऱ्या सत्रामध्ये मैदानावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मैदानाची आखणी, मोजमाप, खेळासाठी लागणारे साहित्य, नियम, तांत्रिक बाबी तसेच विज्ञानाचे नियम खेळात कसे वापरता येतात, याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष साहित्याचा वापर करून खेळाची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० या कालावधीत सुमारे ६८ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवून क्रीडा मार्गदर्शन व प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यशाळेचे यशस्वी आयोजन क्रीडा संचालक डॉ. प्रतिभा ढाके व क्रीडा समिती यांनी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केले. तसेच प्रा. एस. एम. पाटील व महाविद्यालयातील खेळाडूंचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments