केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची BBC Sportswoman of the Year 2025 पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती; महिला क्रीडा सक्षमीकरणाला नवी चालना ...
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची BBC Sportswoman of the Year 2025 पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती; महिला क्रीडा सक्षमीकरणाला नवी चालना
नवी दिल्ली प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नवी दिल्ली : केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी प्रतिष्ठित BBC Sportswoman of the Year 2025 Awards पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहून भारतातील महिला खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. या सोहळ्यामुळे देशातील महिला क्रीडापटूंना नवे प्रोत्साहन मिळाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “महिलांना क्रीडा क्षेत्रात समान संधी दिल्यास देश अधिक उंची गाठतो. महिला खेळाडूंचे यश हे केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.” भारतातील महिला क्रीडापटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण व क्रीडा विकासाला केंद्र सरकारने प्राधान्य दिले असून ASMITA लीग तसेच राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025 यांसारख्या उपक्रमांद्वारे महिलांसाठी अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक क्रीडा परिसंस्था उभारण्याचा निर्धार अधिक बळकट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास राजीव शुक्ला, रंजीत रंजन, राजीव राय, राहुल कसवान, तसेच Jonathan Munro, रूपा झा यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याशिवाय दिलीप तिर्की, लिएंडर पेस, अंजू बॉबी जॉर्ज, दीपा मलिक आणि योगेश्वर दत्त यांच्यासह देशभरातील आघाडीचे खेळाडू, क्रीडा प्रशासक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत ‘विकसित भारत’च्या दिशेने वाटचाल करत असताना क्रीडा क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व, आत्मविश्वास आणि यश हे राष्ट्रीय प्रगतीसाठी प्रभावी प्रेरणाशक्ती ठरेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला.


No comments