चित्रकार अनिलराज यांना ‘नाग चंद्रेश्वर’ पेन-इंक चित्रासाठी आंतरराष्ट्रीय अचिव्हर्स अवॉर्ड २०२६ चोपडा प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायक...
चित्रकार अनिलराज यांना ‘नाग चंद्रेश्वर’ पेन-इंक चित्रासाठी आंतरराष्ट्रीय अचिव्हर्स अवॉर्ड २०२६
चोपडा प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राजस्थानमधील कोटा येथील ज्ञान उदय फौंडेशन यांच्या वतीने प्रख्यात चित्रकार अनिलराज यांना त्यांच्या ‘नाग चंद्रेश्वर’ या पेन-इंक चित्रासाठी आंतरराष्ट्रीय अचिव्हर्स अवॉर्ड 2026 प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या कलाकृतीला मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे कला क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापर्व शिवरात्रीच्या निमित्ताने अनिलराज यांनी भगवान शिवाच्या ‘श्री जटाधर नागचंद्रेश्वर’ या दिव्य स्वरूपाचे प्रभावी आणि सूक्ष्म रेखाटन पेन-इंकच्या साहाय्याने साकारले आहे. अत्यंत बारकाईने, संयमाने आणि कल्पकतेने रेखाटलेल्या या चित्रात शिवरूपातील तेज, अध्यात्म आणि नागचंद्रेश्वराची अलौकिकता प्रभावीपणे व्यक्त झाली आहे.
पेन-इंकसारख्या साध्या माध्यमातून इतक्या सूक्ष्म तपशीलांसह साकारलेली ही कलाकृती प्रेक्षकांना आध्यात्मिक अनुभूती देणारी ठरत असून परीक्षकांनीही तिचे विशेष कौतुक केले. पारंपरिक धार्मिक संकल्पना आणि आधुनिक रेखाटन शैली यांचा सुंदर मिलाफ या चित्रातून दिसून येतो.
या सन्मानाबद्दल अनिलराज यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “शिवभक्ती आणि कला ही माझ्यासाठी साधना आहे. या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे अधिक प्रेरणा मिळाली असून भविष्यातही अशाच सर्जनशील कलाकृती साकारण्याचा प्रयत्न राहील.”
अनिलराज यांच्या या यशाबद्दल कला क्षेत्रातील मान्यवर व रसिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments