पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी चोपडा प्रतिनिधी – (संपादक -:- हेमकांत गायकवाड) “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आध...
पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
चोपडा प्रतिनिधी –
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
“निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू...” या ओवीप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वराज्याचे प्रेरणादायी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने साजऱ्या करण्यात आलेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य मिलिंद पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी समन्वयक उपमा जैस्वाल व समन्वयक शारदा अहिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित प्रभावी भाषणे सादर करत स्वराज्याचा अभिमान जागवला. पराक्रमाच्या गाथा सांगणाऱ्या जोशपूर्ण पोवाड्यांनी सभागृह दणाणून गेले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली, तर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या लेझीम सादरीकरणाने देशभक्तीची भावना जागवली.
कार्यक्रमाचे सुबक व प्रभावी सूत्रसंचालन शुभांगी पाटील यांनी केले. लेझीम नृत्यासाठी मानसिंग वळवी यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण कार्यक्रमात शिवभक्ती, राष्ट्रप्रेम आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणादायी अनुभूती मिळाली.
जयंतीनिमित्त संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, संस्थाध्यक्ष पंकज बोरोले तसेच उपाध्यक्ष अविनाश राणे यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments