इंदिरा गांधी व आदर्श विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ; बक्षीस वितरण, कॉपीमुक्ती शपथ व समई भेट विकास...
इंदिरा गांधी व आदर्श विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ;
बक्षीस वितरण, कॉपीमुक्ती शपथ व समई भेट
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व आदर्श माध्यमिक विद्यालय, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला निरोप समारंभ उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. या समारंभात विद्यार्थ्यांना निरोप देतानाच वर्षभरात झालेल्या विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे बक्षीस वितरण, कॉपीमुक्तीची शपथ तसेच कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून समई भेट देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व इंदिरा गांधी विद्यालयाचे सचिव सी. के. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श विद्यालयाच्या सचिव व इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या सुरेखा पाटील उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थितीत आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे, इंदिरा गांधी विद्यालयाचे पर्यवेक्षक ए. एस. पाटील, माजी पर्यवेक्षक आर. एस. पडोळ तसेच सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक एन. बी. पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षिका ज्योती चौधरी यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपशिक्षक शशिकांत पाटील यांनी करून दिला. वर्षभरात शालेय, तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्हे, प्रमाणपत्रे व बक्षिसे प्रदान करण्यात आली.
समारंभात विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान प्रामाणिकपणा व शिस्त पाळण्याचा निर्धार करत कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली. या शपथेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सचोटी व नैतिक मूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगतातून शालेय जीवनातील आठवणी, शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व भविष्यातील स्वप्ने व्यक्त केली. डिंपल जावरे, वैष्णवी महाजन, अक्षदा इंगळे, उज्ज्वला धामोडे, आकांक्षा गुंजाळ, मिलिंद कोल्हे, चैताली सयाजी, जान्हवी पाटील व मिताली चौधरी यांनी मनोगत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या वर्गशिक्षिका वैशाली पाटील व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत विद्यालयाला समई भेट दिली. ही समई ज्ञानाचा प्रकाश सदैव तेवत ठेवण्याचे प्रतीक असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
मार्गदर्शन करताना आर. एस. पडोळ, ए. एस. पाटील व संदीपकुमार सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सातत्य व शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. प्राचार्या सुरेखा पाटील यांनी प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून प्रामाणिक कष्टांच्या जोरावर यश संपादन करावे, असा संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात सी. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्कार, मूल्ये व सकारात्मक दृष्टिकोन यांचा कानमंत्र दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक किरण चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका किर्ती मराठे यांनी मानले. निरोप समारंभ, बक्षीस वितरण, कॉपीमुक्ती शपथ व समई भेट यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.



No comments