ज्ञान, संस्कार आणि अध्यात्माचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या ह.भ.प. मनोहर खोंडे सरांना सेवानिवृत्ती निमित्त मानाचा मुजरा राष्ट्रीय कीर्तनकार, भाग...
ज्ञान, संस्कार आणि अध्यात्माचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या ह.भ.प. मनोहर खोंडे सरांना सेवानिवृत्ती निमित्त मानाचा मुजरा राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य
![]() |
| ह.भ.प. मनोहर खोंडे सर |
आजचा हा सुवर्णक्षण पुन्हा कितीही शोधले तरी सापडणार नाही… आठवणींच्या पावसात कधी नकळत भिजलो, हेही आता उमगणार नाही. एस.टी.-ट्रेनचा रोजचा धावपळीचा प्रवास, वर्गातील गडबड-गोंधळ, घंटानादाची घाई — हे सगळे आता केवळ आठवणींच्या कप्प्यात साठून राहील. रविवारची खरी मजा शनिवारीच कळायची, टिफिनमधील तेल बॅगेत गळायचे, घड्याळाची टिक-टिक वेळेवर धावायला लावायची — आज त्या सवयीही तुमच्यासोबत निवृत्त झाल्या आहेत. आदरणीय मनोहरजी खोंडे सर, तुम्ही केवळ एक शिक्षक नव्हता, तर आम्हा सर्वांसाठी एक आदर्श, एक प्रेरणा, एक प्रेमळ मार्गदर्शक आणि प्रसंगी खरा मित्रही होता.
शाळेच्या प्रत्येक भिंतीला, प्रत्येक वर्गखोलीला आजही तुमच्या पावलांची चाहूल लागते आहे. तुमची उपस्थिती इतकी आत्मीय होती की तुमचा निरोप स्वीकारणे आमच्यासाठी खरोखरच कठीण झाले आहे. आज तुमच्या आयुष्यातील एक अध्याय पूर्ण झाला आहे, पण नव्या, सुवर्णकाळाची सुरुवात झाली आहे. आता ना कामाचा ताण, ना वेळेची मर्यादा, ना घड्याळाची बंधने. आता वेळ आहे — स्वतःसाठी जगण्याचा, आठवणींना उजाळा देण्याचा, कुटुंबासोबत प्रेमाचे क्षण साठवण्याचा आणि मनसोक्त फिरण्याचा. तुमच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे, प्रेमळ वागणुकीमुळे, सुसंस्कृत विचारांमुळे तुम्ही प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
सर,
शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते की सेवानिवृत्ती ही आयुष्याची समाप्ती नाही, तर एका नव्या, आनंदमय आणि तेजस्वी पर्वाची सुरुवात आहे. आपली पुढील वाटचाल आरोग्यदायी, समाधानी, आनंदाने आणि अध्यात्मिक तेजाने समृद्ध होवो, हीच सदिच्छा. आपल्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक :—
रामचंद्र भाऊ येशी
महाराष्ट्र नाभिक महामंडळ
उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष


No comments